एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन चित्रकला स्पर्धेत 850 मुलांचा सहभाग
पुणे : एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन तर्फे रविवार 21 जानेवारी 2024 रोजी एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन येथे मुलांसाठी चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सुमारे 850 ते 900 मुलांनी सहभाग घेतला होता.
एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन तर्फे दर वर्षी प्रमाणे यंदा हि चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धा स्पर्धेचे आयोजन केले गेले असून या स्पर्धेत प्रवेश निशुल्क होते. 5-10 वर्षे मधील गटातील स्पर्धकांसाठी माझे आवडते टॉय, बलून मॅन रात्रीचे आकाश, तर 11-15 वर्षे गटातील स्पर्धकांसाठी पाणी वाचवा, क्रीडा दिवस, जंगल हा विषय देण्यात आला होता. पुणे शहरातील विविध भागातील शाळेतील सुमारे 850 ते 900 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. सुरेश पिंगळे (मानद सचिव, एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन), अनुपमा बर्वे (मानद सहसचिव) यशवंत खैरे (मानद सचिव) उपस्थित होते, तर एम्प्रेस गार्डन मित्र परिवाराचे रागिणी कक्कर, निवेदिता वाडेकर यांनी पर्यवेक्षकाचे कांम पाहिले. या स्पर्धेतील विजेत्यांना पुष्प प्रदर्शनाच्या समारोपाच्या म्हणजेच 28 जाने. 2024 रोजी बक्षिस वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सुरेश पिंगळे यांनी दिली.
एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शनाची जय्यत तयारी सुरु
दर वर्षी ज्या पुष्प प्रदर्शनांची पुणेकर वाट पाहत असतात अशा पुष्पप्रदर्शनाची जय्यत तयारी सुरु झाली असून गुलाब फुलांचे विविध प्रकार, झेंडू, फ्लॉक अॅस्टर, जरवेरा, शेवंती, निशिगंधा आदींसह विविध हंगामी फुले, पुष्परचना, मिनी एचर गार्डन, बोन्साय, कॅक्टस यांच्या माध्यमातून एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन मध्ये दि.25 ते दि.28 जानेवारी दरम्यान चार दिवसांचे ‘पुष्पप्रदर्शन 2024’ भरणार आहे. या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असल्याचे सुरेश पिंगळे (मानद सचिव, एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन) यांनी सांगितले .
हे पुष्प प्रदर्शन सकाळी 9 ते सायं. 7. 30 या वेळेत सुरू राहील. कार्यक्रमाच्या प्रांगणात संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात प्रामुख्याने मोसमी व हंगामी फुलांची मांडणी करण्यात येणार आहे. या सोबतच कुंडीतील वनस्पती, बोन्झाय, लटकणार्या कुंडीतील रोपे, सावलीत वाढणारी झाडे, आधार घेऊन पसरणारे वेल यांची मांडणी करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या भागातून फुलांचे रोप गार्डमध्ये दाखल झाले असून यांची देखरेख व सजावट केली जात आहे.
