‘अक्षरदान प्रतिष्ठान’तर्फे तिसरी ‘संत तुकाराम वैश्विक कथालेखन स्पर्धा’
पुणे : अक्षरदान प्रतिष्ठानतर्फे तिसरी ‘संत तुकाराम वैश्विक कथालेखन स्पर्धा-२०२३’ आयोजित केली आहे. कथेला विषयाचे बंधन नसून कोणत्याही जागतिक विषयांवर मराठी भाषेत आणि दीड हजार शब्दांच्या पुढे लिहिलेली कथा दि. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत पाठविणे आवश्यक आहे.
कथा स्पर्धेचे हे तिसरे वर्षे असून प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५००१, ३००१, २००१ रुपयांची पुस्तके, संत तुकाराम महाराजांची प्रतिमा देऊन, तर सर्व सहभागींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. २०२२ आणि २०२३ वर्षांतील कथा स्पर्धेचे निकाल दि. २८ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिवस’ या दिवशी जाहीर होतील. “दोन वर्षे या स्पर्धेला लेखकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यंदाही दर्जेदार लेखनाला, नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळावे आणि जागतिक दर्जाचे श्रेष्ठ विचारवंत, कवी असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे स्मरण व्हावे, यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. इच्छुकांनी akshardan2014@gmail.com यामेलवर कथा पाठवाव्यात,” असे आवाहन अक्षरदानचे संपादक मोतीराम पौळ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९६३७९९३३१९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
