Monday, August 31, 2026
Latest NewsNATIONALPUNE

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढण्यात पुणेकराचा सहभाग

पुणे : उत्तरप्रदेशातील अयोध्येत साकारत असलेल्या श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी भारतातील ठराविक मोजक्याच विद्वान ज्योतिषांनी मुहूर्त काढले. यामध्ये पुण्यातील पंचांगकर्ते ज्योतिषी गौरव देशपांडे यांचाही सहभाग असून देशपांडे यांनी काढलेल्या २२ जानेवारी, २०२४ च्या मुहूर्तावरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने या मंदिर पुनर्स्थापनेच्या कार्यात पुण्यातील देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांचा असलेला वाटा ही पुणेकरांसाठी आणि मराठी जनांसाठी अभिमानाची बाब आहे.

याविषयी अधिक माहिती देताना गौरव देशपांडे म्हणाले, “श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने २० एप्रिल, २०२३ रोजी आळंदी येथे आले असताना त्यांनी मला बोलावून घेतले. माझा सत्कार करून अयोध्येत साकारत असलेल्या राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सुयोग्य मुहूर्त आपण काढावा अशी इच्छा व्यक्त केली. मुहूर्त हा २५ जानेवारी आधीचा असावा अशी अटही त्यांनी यावेळी घातली. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी २९ एप्रिल रोजी ज्योतिष, मुहूर्त शास्त्र आणि धर्मशास्त्राच्या आधारे सोमवार दि. २२ जानेवारी हा दिवस आणि अयोध्येच्या अक्षांश रेखांशानुसार मेष लग्नावरील विशिष्ट स्थिर नवमांश बघून मुहूर्त काढून तो त्यांना औपचारीकरीत्या पत्राद्वारे कळविला. अशा पद्धतीने या ऐतिहासिक घटनेसाठी भारतातील निवडक विद्वानांनी मुहूर्त काढले असून सुदैवाने २२ जानेवारी याच दिवशी श्रीरामाच्या मूर्तीची होत असलेली प्राणप्रतिष्ठा ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असणार आहे.”

याबदल अधिक माहिती देताना गौरव देशपांडे पुढे म्हणाले, “२०२४ सालाच्या सुरुवातीला १५ जानेवारी रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. याच दिवशी उत्तरायणाला सुरुवात होत असून यामध्ये सात्विक प्रकृती असलेल्या देवतांची स्थापना केली पाहिजे असे सांगण्यात आले आहे. मात्र २५ जानेवारी पर्यंत पौष महिना येत असल्याने या काळात श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करायची का हा प्रश्न होता. त्यानुसार अभ्यास केला असता बृहदैवज्ञ रंजन, विद्या माधवीय आणि मुहूर्त गणपती या दोन्ही ग्रंथांमध्ये पौष महिन्यात प्राणप्रतिष्ठा केली जाऊ शकते असा उल्लेख आहे. या महिन्यात प्राणप्रतिष्ठा केल्यास राज्य वृद्धी होते असेही यामध्ये सांगण्यात आले आहे. याबरोबरच विद्यामाधवीय व गणपती दैवज्ञ यांच्या ग्रंथानुसार पौष व माघ महिन्यात कोणत्याही देव देवतांची प्राणप्रतिष्ठा करता येते असाही उल्लेख सापडला. याचाच अर्थ श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पौष महिन्यात करता येऊ शकते असे शास्त्रात संगितले आहे.”

तिथीबद्दल बोलायचे झाल्यास मुहूर्त चिंतामणी ग्रंथामध्ये स्वत: नारद महर्षी तिथीबद्दल सांगतात की देवतेच्या तिथीप्रमाणे त्या देवतेचा निवास त्याच तिथीत असतो. याप्रमाणे श्रीराम हे श्रीविष्णू यांचे अवतार समजले जातात द्वादशी ही विष्णूची तिथी सांगितली जाते त्यामुळे श्रीरामाच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी द्वादशीचीच तिथी योग्य आहे. वार कोणता असावा यावर मंगळवार सोडून प्रत्येक वार शुभ असल्याने सोमवार हा दिवस घेतला गेला. शिवाय मुहूर्त चिंतामणी पीयूषधारा टिकेनुसार सर्व देवांसाठी सर्वश्रेष्ठ असलेल्या नक्षत्रांपैकी मृग नक्षत्र घेण्यात आले. अशा प्रकारे सोमवार २२ जानेवारी, २०२४ पौष शुद्ध द्वादशी रोजी संपूर्ण दिवस मृग नक्षत्र असताना अयोध्येच्या अक्षांश रेखांशानुसार मेष लग्नावरील विशिष्ट स्थिर नवमांश बघून हा मुहूर्त श्रीरामांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठेसाठी काढण्यात आला आहे, असे गौरव देशपांडे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading