३० डिसेंबर रोजी ‘संगीत संध्या’ कार्यक्रम
पुणे : पुण्यातील स्वराधार फाउंडेशन या संस्थेच्या वतीने येत्या शनिवार दि. ३० डिसेंबर, २०२३ रोजी ‘संगीत संध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एरंडवणे येथील कर्नाटक हायस्कूलच्या शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृहात सायं ५.३० वाजता सदर कार्यक्रम संपन्न होणार असून यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ वीणा सहस्त्रबुद्धे यांचे शिष्य अतुल खांडेकर यांचे गायन होईल. त्यांना प्रणव गुरव तबल्यावर व अभिषेक शिनकर संवादिनीवर साथ करतील. त्यानंतर ज्येष्ठ तबलावादक पंडित रामदास पळसुले यांचे एकल तबलावादन अनुभविण्याची संधी रसिकांना मिळेल.
कार्यक्रमासाठी एयर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांची प्रमुख उपस्थिती असणार असून यावेळी भूषण गोखले यांच्या हस्ते तबलावादक असलेल्या गुणी विद्यार्थ्यांना स्वराधार फाउंडेशनच्या वतीने रु ५,०००/- ची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वराधार फाऊंडेशनचे संचालक नील दीक्षित व हेरंब चक्रदेव यांनी कळविली आहे. मंगेश वाघमारे या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
