अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात छात्रभारतीने केली निदर्शने
पुणे: काल ता. १४ डिसेंबर रोजी छात्रभारती पुणेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याविरोधात निदर्शने नोंदवण्यात आली. “पीएचडी करून विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत का?”, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी अधिवेशनात केलं होत.
यावेळी संशोधक विद्यार्थी अमोल शिंगाडे म्हणाले की, “बार्टी, सारथी आणि महाज्योती या योजनांच्या माध्यमातून आज जे विद्यार्थी पीएचडी करत आहेत, यातील बहुतांश विद्यार्थी हे पहिल्या पिढीतले शिकणारे विद्यार्थी आहेत. यातील मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी कोणाचा बाप दगड फोडतोय, तर कोणाचा बाप आज शेतात मजुरी करतोय. अशा परिस्थितीतून शिकणाऱ्या या मुलांसंदर्भात असं वक्तव्य करण हे अत्यंत निराशाजनक आहे.”
तर, छात्रभारती पुणेचे जिल्हाध्यक्ष प्रफुल कांबळे म्हणाले की, “पीएचडी करणारे विद्यार्थी सहज तिथपर्यंत पोहचलेले नसतात. त्यासाठी अनेक परीक्षा त्यांना पास कराव्या लागतात. उलट सरकारने सर्व समाजातील विद्यार्थ्यांची सरसकट फेलोशीपची मागणी मान्य करायला हवी. जेणेकरून त्यांच्या शिक्षणातील आर्थिक अडचणी कमी होतील, हीच आमची मागणी आहे.”
