Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

आधूनिक तंत्रज्ञान वापर करून हवाई दल गतीशील झाले आहे – एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी

पुणे  : युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार राहण्यासाठी, निर्णयप्रक्रियेतील वेळ कमी करण्यासाठी हवाई दलातील विविध विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे. हवाई दल आधुनिक करण्यासाठी एआय, ५ जी, मशिन लर्निंग, फोर्थ जनरेशन टेक्नॉलॉजी यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी पीव्हीएसएम एव्हीएसएम व्हीएसएम एडीसी यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ‘भारतीय हवाई दलाचे समकालीन आणि भविष्यातील रेडी एरोस्पेस फोर्समध्ये परिवर्तन’ याविषयावर ते बोलत होते. याप्रसंगी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रभारी कुलसचिव आणि संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे उपस्थित होते. याप्रसंगी ‘जनरल बी.सी.जोशी मेमोरियल लेक्चर ऑन नॅशनल सिक्योरिटी’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. दिल्लीतील पेंटागॉन प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्ताकाचे संपादन माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी केले आहे.

हवाई दलाच्या मानव संसाधन, इंफ्रास्ट्रक्चर, ट्रेनिंग, ऑटोमेशन, क्रिटिकल इंफॉर्मेशन इंफ्रास्ट्रक्चर, नेटवर्किंग या वेगवेगळ्या विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे. यामुळे हवाई दल गतीशील झाले आहे. या सर्वांसाठी एअर फोर्स सायबर ग्रुपही बनवण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत तंत्रज्ञानाचा वापर करून स्वार्म ड्रोन बनविण्यात आले आहे. या ड्रोनसाठी हवाई दलाला आतापर्यंत ८०० कोटींची ऑर्डर आली असून भविष्यात दोन हजार कोटींची ऑर्डर येणार असल्याची माहिती एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी पीव्हीएसएम एव्हीएसएम व्हीएसएम एडीसी यांनी दिली. यावेळी त्यांनी हवाई दलातील विविध विभागाच्या कार्याची माहितीही उपस्थितांना दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे दरवर्षी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. ‘गेटवे ऑफ नॉलेज’ गेटची स्थापना करणाऱ्या जनरल बी. सी. जोशी यांच्या अकाली निधनानंतर त्यांचा वारसा आणि दूरदृष्टींचा सन्मान करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग आणि दक्षिणी कमांडच्या मुख्यालयाने १९९५ मध्ये जनरल बी. सी. जोशी यांच्या नावे वार्षिक व्याख्यानमाला सुरू केली होती.

विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या या व्याख्यानाला हवाई दल, नौदल आणि लष्करातील अधिकारी उपस्थित होते. तसेच अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांच्यासह शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थीही उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading