सिंधुताईस ममता सपकाळ यांचे पत्र
प्रिय आईस,
आज मार्गशीर्ष महिन्याची शुद्ध द्वितीया. तिथीप्रमाणे आज तुझा दुसरा स्मृती दिन. बघता बघता दोन वर्षे उलटली सुद्धा. तुझ्यापासून दूर राहण्याचा आजवरचा हा माझा सर्वात मोठा कालावधी. माझं बालपण, शाळा, कॉलेज, संस्थेची जबाबदारी, लग्न या सगळ्या काळात एकच गोष्ट कॉमन होती ते म्हणजे तुझं भेटत राहणं. गेल्या दोन वर्षात अशा कितीक वेळा येऊन गेल्यात की पटकन वाटून गेलं. तू येशील..तू भेटशील.. तू बोलशील.. पण तस झालं नाही.
२०२० आणि २०२१ या कोरोना काळात मी काय मिळवलं असेल तर तो म्हणजे तुझा सहवास. वाईटातूनही काही चांगलंच समोर यावं तशी ही बाब. सलग दोन वर्षे रात्रंदिवस तू सन्मती बाल निकेतन मांजरी येथे असणं म्हणजे आयुष्यातला सुवर्णकाळ म्हणावा लागेल. आणि त्याहूनही पुढे जाऊन शेवटचे अडीच तीन महिने तू माझ्याकडे माझ्या घरी असणं म्हणजे आयुष्यभराच्या सगळ्या उणिवा संपून जाणं होत. माझ्या बेडरूम मध्ये तुझं अस्तित्व भरून उरलं होत त्या काळात. सभोवताली पुस्तकंच पुस्तकं असणारी आणि त्यात एकेक पान पालटत रमून गेलेली तू जशीच्या तशी आठवतेस मला. तुझा सकाळचा चहा ते रात्रीच औषध देऊन दिवा मालवण्यापर्यंतचा दिनक्रम अजूनही पाठ आहे बघ. तुझी कपबशी.. लिहिण्यासाठी आणलेला छोटा टेबल..तू मागवलेली खुर्ची अजून त्याच जागी आहेत. अजूनही बाल्कनीत तुझी नऊवार साडी वाळत असल्याचा भास होतो. तुझ्या दोन साड्या तर आजही माझ्या कपाटात मी तशाच ठेवून दिल्या आहेत. अजून तुझा वास आहे त्यांना.
मुळात या दोन वर्षात सगळ्यात जास्त जाणवलेली गोष्ट म्हणजे तुझ्या जाण्याने ज्या गोष्टी कायमच्या संपल्या त्या होत. जस की तुझं मला पटकन जवळ ओढून घेणं, गुदमरून जाईन इतकं लाड करणं, एक पप्पी तर कधी घेतलीच नाहीस तू. गाल ताब्यात आला की एकाच जागेवर सलग आठ दहा बारा पप्प्या ठरलेल्या असायच्या तुझ्या. तो आवाज रात्री अपरात्री अजूनही कानात येत असतो. आणि मग जाणवत की आपलं खूप काही आईसोबत पुढे निघून गेलय. आपण आता अर्धेच मागे उरलो आहोत. हे रितेपण आता भरणार नाही. आपण पुन्हा खळाळून ओसंडून वाहणार नाही कारण आता आपला झरा अदृश्य झालाय. स्रोत आटून गेलाय. पण मग हा ही साक्षात्कार होतो की क्षणाक्षणाने जर आपण पुढे जातोय तर कणाकणाने सरतोय सुद्धा. हे सरणं जेंव्हा थांबेल तेंव्हा तुझ्यापर्यंत मी पोहोचलेली असेन म्हणजेच आजही प्रवास तुझ्या दिशेनेच होतो आहे. हरकत नाही. तोवर तू खांद्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडायची आहे. घर असो वा संस्था तिथलं मोठं माणूस गेलं की लहानांनी मोठं व्हायचं असत. तुझ्या जाण्याने एका क्षणात ते मोठेपण वाट्याला आले आहे. आणि सध्या मी ते निभावून नेते आहे. अर्थात बळ तूच पुरवणार यात शंका नाही.
आजही तुझं माझ्या स्वप्नात येणं सुरूच आहे. कधी जवळून, कधी लांबून, कधी हसताना, कधी बोलताना, कधी चालताना, कधी थांबताना तू दिसतेच आहेस. तू आजवर स्वप्नात येऊन दिलेले दृष्टांत लिहिणे म्हणजे एक वेगळा विषय होऊ शकेल. मात्र कायम तू स्वप्नात दिसलीस ती प्रसन्नच. तुझा प्रफुल्लित चेहरा आणि हसरे डोळे कायम ऊर्जा देत आहेत. यापुढेही देत राहतील. तू आखून दिलेली वाट मी चालत राहणार आहे आई . तुझा वसा आणि वारसा जिवापाड जपत राहणार मी. तू म्हणायचीस .. दरवेळी संकटावर पायच द्यायला हवा अस काही नाही ममता .. कधीतरी वळसा घालूनही पुढे जाता आलं पाहिजे. तेच करते आहे.. करत राहीन.
मम्मा, ऐकते आहेस ना.!…
तुझीच,
मी.
- ममता सिंधुताई सपकाळ.
