Saturday, April 4, 2026
Latest NewsPUNE

सतीश पाकणीकर यांचे ​थीम कॅलेंडर – ‘स्वरजयी कुमारगंधर्व २०२४’

पुण्यातील औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर हे श्रेष्ठ व्यक्तीमत्त्वांच्या प्रकाशचित्रांसाठी आणि त्यांवर आधारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वार्षिक दिनदर्शिकांसाठी प्रसिद्ध आहेत. २०२४ सालासाठीही अशाच सुंदर दिनदर्शिकेची एक संग्राह्य अशी निर्मिती त्यांनी केली आहे. ‘स्वरजयी कुमारगंधर्व’ असे नाव असलेल्या या दिनदर्शिकेने आपण नव्या वर्षाचे स्वागत करूया !

सतीश पाकणीकर यांच्या ‘थीम कॅलेंडर’चे हे बावीसावे वर्ष असले तरीही मध्यंतरीच्या (२०११,२०१२ व २०१३) या तीन वर्षात त्यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासाठी निर्माण केलेल्या तीन थीम कॅलेंडरचा विचार करता यावर्षीचे कॅलेंडर हे रौप्य महोत्सवी म्हणजेच २५ वे कॅलेंडर असेल. कलावंतांच्या भावमुद्रा, त्यांचे विचार, संगीताबद्दल कलाकारांनी व्यक्त केलेली मते, सादरीकरणात त्यांना झालेला आनंद, वेगवेगळ्या बंदिशी व काव्य अशा आयामांनी सजलेली ही थीम कॅलेंडर्स रसिकांच्या पसंतीला उतरली आहेत.

८ एप्रिल १९२४ हा प्रतिभासंपन्न, बुद्धिमान, भावस्पर्शी आणि संवेदनशील अशा कलावंताचा म्हणजे कुमार गंधर्व यांचा जन्मदिवस. अर्थातच हे या महान कलावंताचे जन्मशताब्दी वर्ष. ही शताब्दी थीम कॅलेंडरच्या माध्यमातूनही साजरी व्हावी व कुमारजींना आदरांजली अर्पण करावी हा या थीम कॅलेंडरचा उद्देश.

परंपरेत काळाच्या ओघात कुठल्याही कलाक्षेत्रामध्ये साचलेपण तयार होते. हे साचलेपण ओळखण्याची कलात्मक दृष्टी त्या काळातील प्रत्येक कलावंताकडे असतेच असे नाही. हे साचलेपण दूर करून परंपरा पुन्हा प्रवाही करण्याचे कार्य करण्यासाठी प्रतिभाशाली कलावंत जन्मावा लागतो. पंडित कुमार गंधर्व यांच्या रूपाने भारतीय अभिजात संगीताला तो लाभला. परंपरेच्या प्रवाहातही आधुनिकतेची कास धरत नवतेच्या अंगाने त्यांनी आपली स्वतःची गायनशैली विकसित करत परंपरेतूनच नवतेचा जन्म होतो याची जाणीव रसिकांना करून दिली.

‘प्रकाशचित्र’ हा आतापर्यंच्या थीम कॅलेंडरचा गाभा. त्यामुळेच कुमारजींच्या काही अप्रकाशित अशा भावमुद्रांची निवड येथे केली आहे. सोबतच ज्येष्ठ पत्रकार श्री. मुकुंद संगोराम यांच्या सुरेल व चिकित्सक लेखणीतून उमटलेल्या कुमारजींच्या ‘शब्दमुद्रा’ त्यांची वैशिष्ट्ये उलगडून दाखवणार आहेत. रसिक याचे स्वागत करतील असा विश्वास वाटतो.

स्व. कुमारजींच्या अलौकिक सुरांच्या सोबतीने नव्या वर्षाचे स्वागत करून आख्खं वर्ष संगीतमय करू या

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पहिल्याच सत्रात ज्येष्ठ गायक पंडित उल्हास कशाळकर यांच्या शुभ हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन होणार आहे.  कुमारजींची ही ‘स्वर-प्रकाशचित्र-यात्रा’ आपलं आख्खं वर्ष संगीतमय करो या शुभकामनांसह…

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading