पादचारी दिन साजरा करताय पण पादचाऱ्यांना चालण्या योग्य फुटपाथ आहेत का? आप चा पुणे महापालिकेला सवाल
पुणे:पुणे महानगरपालिकेतर्फे आज पादचारी दिन साजरा केला गेला. हा दिन साजरा करताना आज लक्ष्मी रस्त्यावर नो व्हेईकल झोन निर्माण केले गेले. तसेच शहरातील अनेक भागातील रस्त्यावर पुणे महानगरपालिकेतर्फे झेब्रा क्रॉसिंग चे पट्टे मारले गेले. खरे पाहता वाहतुकीचे नियम हे नित्यनियमाने पाळले जायला हवे परंतु वर्षातून केवळ एक दिवस या सर्व गोष्टी केल्या जात असल्याचे दिसून येते असे आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष सेंथिल अय्यर यांनी आज बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, खरे पाहता शहरातील सर्व रस्त्यांवर पहिला अधिकार हा पादचाऱ्यांचा असतो परंतु आज अशी परिस्थिती आहे की पादचारी यांना चालण्याकरिता शहराच्या अनेक भागात फुटपाथ उपलब्ध नाहीत ज्या ठिकाणी फुटपात आहेत त्या ठिकाणी अतिक्रमणे झालेली पाहायला मिळतात आणि अशा परिस्थितीत महापालिका मोठ्या उत्साहाने पादचारी दिन साजरा करण्याचा देखावा करत आहे.
शहरात आपल्याला अनेकदा अनेक ज्येष्ठ नागरिक हे रस्त्याच्या कडेने चालत असल्याचे चित्र दिसते तसेच अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे अशाप्रकारे रस्त्यावरून चालणे देखील शक्य नसते त्यामुळे पादचार्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी महापालिकेने व्यवस्थित फुटपाथ बांधणे गरजेचे आहे. तसेच त्यांची देखभाल देखील करणे तितकेच गरजेचे आहे असे अभिजीत परदेशी यांनी सांगितले.
महापालिकेने अनेक ठिकाणी फुटपाथचे रूपांतर हॉकर्स झोन मध्ये करून पायी चालणाऱ्या व्यक्तींवर खरंच अन्याय केलेला दिसून येतो, त्यामुळे फुटपाथ वरील सर्व अतिक्रमणे काढून शहरातील आरक्षित जागांवर फूड मॉल सारखे उपक्रम राबवले गेले पाहिजे असे आपचे पुणे शहर मीडिया सहसंयोजक ॲड.अमोल काळे यांनी सांगितले.
याप्रसंगी आम आदमी पक्षातर्फे सेंथिल अय्यर, अभिजीत परदेशी, व ॲड.अमोल काळे यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना पादचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यां बाबतीत चे निवेदन दिले.
