ज्ञानी, कुशल मनुष्यबळ हा सहकारी बँकांचा पाया – सहकार आयुक्त अनिल कवडे
पुणे : रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांना वेगळे महत्व दिले आहे, हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे काळानुसार होणारे बदल स्वीकारून बँकांनी वाटचाल करणे महत्वाचे आहे. त्याकरिता बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी वर्गाने न नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करीत समर्पित भावनेने काम करायला हवे. ज्ञानी व कुशल मनुष्यबळ हा नागरी सहकारी बँकांचा खरा पाया आहे, असे मत राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी व्यक्त केले.
पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे (महाराष्ट्र) तर्फे नागरी सहकारी बँकांमध्ये नियामक अनुपालन म्हणजेच रेग्युलेटरी कम्प्लेयन्स आणि तांत्रिक अनुप्रयोग म्हणजेच आयटी चा उपयोग कशा प्रकारे व्हावा, त्याबाबत आव्हाने आणि संधी काय आहेत, याविषयी चर्चा व मार्गदर्शन करण्याकरिता ‘राज्यस्तरीय बँकिंग परिषद’ पुणे रेल्वे स्टेशनजवळील हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे आयोजित करण्यात आली. त्याचे उद्घाटन ‘सहकाररुपी’ प्रातिनिधीक वृक्षाला पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अॅड.साहेबराव टकले, संचालक रमेश वाणी, निलेश ढमढेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ.अनिल कारंजकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पुण्यासह इतर जिल्ह्यातील ११२ हून अधिक बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, संगणक विभाग प्रमुख व पदाधिकारी असे ३०० हून अधिक जण सहभागी झाले.
अनिल कवडे म्हणाले, देशातील एक तृतीयांश बँका या महाराष्ट्रात आहेत. तसेच ५० टक्के हून अधिक ठेवी देखील महाराष्ट्रातील बँकांमध्ये आहेत. देशाच्या आर्थिक विकासात व प्रगतीत महत्वाचा वाटा नागरी सहकारी बँकांचा आहे. त्यामुळे संचालकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून काम करायला हवे. माहिती तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करणारी व्यवस्था आणणे, ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. सुभाष मोहिते म्हणाले, सहकारी बँकांचे हित व उत्कर्षासाठी सन १९७९ साली असोसिएशनची स्थापना झाली. बँकिंगमध्ये निर्णय घेणा-या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालकांनी एकत्र यावे आणि बँकांना काम करताना येणा-या आव्हानांवर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्याकरिता परिषदेचे आयोजन करण्यात आले. कुशल मनुष्यबळ नागरी बँकांमध्ये असायला हवे. छोटया बँकांमध्ये आज अशा प्रकारचे मनुष्यबळ नाही, ही शोकांतिका आहे. अशा समस्यांवर मार्ग काढण्याचा असोसिएशनचा प्रयत्न आहे. अधिकारी व कर्मचा-यांना दैनंदिन कामकाजात येणा-या अडचणींवर मार्गदर्शन करण्यासाठी असोसिएशन सदैव तत्पर असते. बँकांचे संचालक, सेवक उत्तमप्रकारे प्रशिक्षीत व्हावेत आणि सहकारी चळवळ सुदृढ व्हावी, हा असोसिएशनचा प्रयत्न असतो आणि यापुढेही राहणार आहे.
