Thursday, June 18, 2026
Latest NewsLIFESTYLE

जहांगीर आर्ट गॅलरीत ज्येष्ठ चित्रकार प्रकाश भिसे यांचे “स्पेक्ट्रम” चित्र प्रदर्शन आजपासून

ज्येष्ठ चित्रकार आणि सुप्रसिद्ध जेजे स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी प्रकाश भिसे यांच्या “स्प्रेक्ट्रम” या चित्र प्रदर्शनाचे आयोजन जहांगीर आर्ट गॅलरी येथे दि ५ ते ११ डिसेंबर २०२३ दरम्यान करण्यात आले आहे. चार दशकांपासून प्रकाश भिसे हे चित्रकलेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. त्याचबरोबर रहेजा स्कूल ऑफ आर्ट येथून ते प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत. प्रस्तुत प्रदर्शनात त्यांच्या सुमारे ४८ अमूर्त चित्रांचा कला रसिकांना आस्वाद घेता येईल. भिसे यांनी आजपर्यंत अनेक कला प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे. त्यांची अनेक चित्र प्रदर्शने देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली आहेत. यामध्ये जर्मनी, हॉलंड, बांगलादेश या देशांमध्ये त्यांनी आपली चित्रे प्रदर्शित केली आहेत. 

प्रकाश भिसे हे २००० सालापासून ऍबस्ट्रॅक्ट शैलीमध्ये काम करतात. त्यापूर्वी त्यांनी अनेक विषय वास्तववादी शैलीतून कॅनव्हासवर मांडले आहेत. चळवळीत अनेक वर्षे काम केल्यामुळे सामाजिक प्रश्नांची प्रकाश भिसे यांना जाण आहे. त्यामुळे त्यांच्या कॅनव्हासवर अनेकदा सामाजिक प्रश्नांना स्थान मिळाले आहे. ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ यांच्या “गोलपिठा” या काव्यसंग्रहावर आधारित चित्रमालिकाही प्रकाश भिसे यांनी केली होती. ही चित्र मालिका प्रचंड गाजली होती. 

प्रकाश भिसे यांची चित्र ही अमूर्त असली तरी द्विमितीय असतात कारण ती लघुचित्रशैलीचा वारसा असलेल्या भारतीय चित्रशैलीशी आपलं नातं सांगतात. भिसे यांच्या मते पाश्चात्य चित्र हे त्रिमित स्वरूपात आपल्यासमोर येते कारण तिथली वातावरणात कायम एक ढगाळ धुकं असल्याने चित्रांमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटते. पण भारतात द्विमित स्वरूपात चित्रे तयार झाली कारण इथला प्रखर सूर्यप्रकाश! या प्रखर सूर्यप्रकाशात आकारांवरची रेषा ही ठळकपणे दिसून येते. त्याचेच प्रतिबिंब आपल्या चित्रांमध्ये उमटते. 

प्रकाश भिसे यांच्या प्रस्तुत स्पेक्ट्रम प्रदर्शनात त्यांनी रंगांचा मुक्त वापर केला आहे. अमूर्त चित्रे ही कला रसिकांना अद्भुत अनुभूती देतात कारण ही चित्रे समजायची नसतात तर अनुभवायची असतात. चित्रकाराचे जीवनानुभव त्याचे जीवन तत्वज्ञान अस्फुटपणे त्याच्या चित्राकृतीतून व्यक्त होत असतात. अमूर्त चित्रांमध्येही त्यांचा अनुभव बघणार्याला येतच असतो. प्रकाश भिसे यांचे आयुष्य हे जीवनानुभवांनी समृद्ध आहे. जेजे मधील तज्ज्ञ प्राध्यापक प्रा. संभाजी कदम, प्रा. विश्वनाथ सोलापूरकर, प्रा. प्रभाकर कोलते, प्रा. मृगांक जोशी, प्रा. पॉल कोळी, प्रा. वसंत सोनवणे, प्रा. एस. के. लवाटे आणि इतर मान्यवर प्राध्याकांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश भिसे यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.  जेजेमध्ये  डीन पळशीकर सरांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकलेचे शिक्षण घेतल्यामुळे वास्तववादी आणि अमूर्त अशा दोन्ही शैलीवर त्यांची पकड आहे.  

भिसे यांची  चित्रे ही कला रसिकाला जबरदस्त  चैत्रीक अनुभूती देतात. भिसे यांची रंग, ब्रश आणि माध्यमांवरील पकड कॅनव्हासवर अद्भुत छायानाटय तयार करते. असंख्य रंग कॅनव्हासवर वापरणे हे सोपे काम नाही त्याला अनेक वर्षाची कला तपश्चर्या लागते. आणि सुमारे चार दशके जी चित्र तपश्चर्या भिसे यांनी केली तीच त्यांच्या चित्रांमधून दिसून येते. भिसे यांनी आपल्या चित्रकला प्रवासात जगण्याचे विविध पोत  शोधले. प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी जीवनातील अनुभवांवर अमूर्त रूपातील चित्र भाष्य केले आहे. यामध्ये  मानवी सुख दुःख, निसर्ग, निसर्गाची हिरवाई, ते थेट युक्रेन रशिया युद्ध यांचे पडसाद भिसे यांच्या कॅनव्हासवर पाहायला मिळतील. 

एका कला तपस्वीच्या कला साधनेला अनुभवण्यासाठी चुकवू नये असे हे प्रदर्शन आहे. कला रसिकांसाठी हे प्रदर्शन सकाळी  ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य खुले राहील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading