न्यायदेवतेने तृतीयपंथीयांना स्वीकारले, पण समाज कधी स्वीकारणार? -गौरी सावंत यांचा खडा सवाल
पुणे : ज्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. जिला काहीही दिसत नाही, अशा न्यायदेवतेने या देशातील तृतीयपंथीयांचा आदरपूर्वक स्वीकार केलेला आहे. परंतु डोळस समाज आजही आमचा पाहिजे त्या सन्मानाने स्वीकार का करीत नाही, असा जळजळीत सवाल तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या तथा तृतीयपंथीयांसाठी निवडणूक आयोगाच्या ब्रँड अॅम्बेसेडर गौरी सावंत यांनी उपस्थित केला.
पुण्यातील डीपी रोडवरील पंडित फार्म येथे आयोजित तीन दिवसीय सुहाना स्वास्थ्यम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी आयोजित विशेष मुलाखतीत गौरी सावंत यांनी विविध मुद्द्यांवर आपले परखड मत मांडले. गौरी सावंत यांनी या वेळी आपला संघर्षपूर्ण जीवनप्रवासदेखील उलगडून दाखवला.
गौरी सावंत म्हणाल्या की, तृतीयपंथीयांचं जीणं हे अत्यंत संघर्षाचं आहे. समाज आमच्याकडे माणूस म्हणून पाहण्यास तयारच नाही. छोट्या-छोट्या गोष्टींसाठीदेखील आम्हाला मोठा संघर्ष करावा लागतो. आम्ही काही परग्रहावरून आलेलो नाही आहोत. एक परिपूर्ण पुरुष आणि परिपूर्ण स्त्रीनेच आम्हाला जन्माला घातलं आहे. आम्हीदेखील सामान्य लोकांसारखेच आहोत. आमच्याही गरजा, आमची जीवनपद्धती ही सर्वसामान्यांप्रमाणेच आहे. परंतु समाजाचा दृष्टिकोन आमच्याकडे तुच्छतेने पाहण्याचा आहे.
स्वतःबद्दल बोलताना गौरी म्हणाल्या की, मी पुण्यातील भवानी पेठेत जन्माला आले. सुरवातीला एक मुलगा म्हणूनच माझे जीवन राहिले. मात्र, शारीरिक बदलामुळे माझं इतर सामान्य मुलांप्रमाणे जगणं नव्हतं. परंतु घरातील सदस्य हे लवकर स्वीकारायला तयार नव्हते. माझ्या वडिलांनी माझ्याबाबत कधीही भेदभाव केला नाही, परंतु जेंव्हा मला माझ्या घरातील इतर सदस्य एका वेगळ्या नजरेनं पहायला लागले आणि नको ती थट्टा होऊ लागली, तेंव्हा मात्र मी घर सोडण्याचा निर्णय घेतला. केवळ ६० रुपये घेऊन मी अचानक घर सोडलं. पुढे तृतीयपंथीयांच्या विश्वात मी गेले. त्या ठिकाणी प्रचंड असा संघर्ष केला. त्यांचं नरकाचं जीणं पाहून जिद्दीने ठरवलं की नाही, हे सगळं बदललं पाहिजे.
त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही दुतर्फा संघर्ष करीत असतो. एक तर घरातील सदस्यांसोबत आमचा संघर्ष होतो आणि दुसरा म्हणजे समाजात आमच्या वाट्याला संघर्ष येतो. आज भारतीय न्याय व्यवस्थेनेही आमचं अस्तित्व मान्य केलं आणि एक मनुष्य म्हणून आम्हाला सन्मान प्रदान केला. त्याबद्दल आम्ही न्यायालयाचे आभारी आहोत, परंतु भारतीय समाज आजही तृतीयपंथीयांना सन्मानाने स्वीकारण्यास तयार दिसत नाही.
ताली चित्रपटाबद्दल बोलताना गौरी सावंत म्हणाल्या की, या चित्रपटात सुष्मिता सेनने अत्यंत दमदार अभिनय केला. या चित्रपटातून तृतीयपंथीयांच्या समस्या, त्यांचा संघर्ष, त्यांची अवहेलना व लढण्याची जिद्द या सर्वांना एक व्यापक स्तरावर मंच उपलब्ध करून दिला. या द्वारे समाजाचा दृष्टिकोन काही प्रमाणात बदलण्यास मदत झाली आहे.
