पदापेक्षा माणूसपण जपणारे सर्वंकष व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रकाश पायगुडे यांना श्रद्धांजली
पुणे : लेखक, वक्ता, सूत्रसंचालक, क्रीडा पत्रकार, क्रीडा समालोचक, उत्तम समन्वयक, सर्व क्षेत्रातील जनसंपर्क असणारा आणि जाहिरात क्षेत्रात नावाजलेला माणूस तसेच कुटुंबवत्सल असलेले प्रकाश पायगुडे यांचे जाणे ही मोठी हानी आहे. त्यांच्या जाण्याने एक सन्मित्र आणि परिषदेने निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. उ
पाध्यक्ष राजीव बर्वे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, पायगुडे यांचे सुपुत्र अंबरीश आणि आधिश पायगुडे, बंधू शरद आणि अविनाश पायगुडे, पत्नी आशालता पायगुडे यावेळी उपस्थित होत्या. प्रकाश पायगुडे यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात नावाजलेला एक उत्तम माणूस गेल्याची हळहळ आठवणीतून विविध मान्यवरांनी व्यक्त केली.
प्रा. जोशी म्हणाले, दिवसेंदिवस संस्थांना चांगले कार्यकर्ते मिळणे कठीण होत आहे. कारण आज प्रत्येक गोष्ट वेळ आणि पैसा या परिमाणात मोजली जाते. अशा परिस्थितीत नि:स्वार्थ बुध्दीने काम करणारे कार्यकर्ते दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे प्रकाश पायगुडे यांचे जाणे ही परिषदेची मोठी हानी आहे. सकारात्मक साहित्यकारण केल्यामुळे त्यांची वेगळी ओळख होती. आधिश पायगुडे म्हणाले, बाबांचे असणे हा गर्व होता, त्यांचे जाणे ही जबाबदारी आहे. त्यांनी आपल्या अफाट लोकसंपर्काचा संस्थेसाठीच उपयोग केला स्वतःसाठी केला नाही.मसापच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यांनी पायगुडे यांच्या साहित्य परिषदेशी असलेल्या नात्याचा उल्लेख केला. त्यांचा भारदस्त आवाज सूत्रसंचालक म्हणून ऐकणे ही एक पर्वणी असायची अशी आठवण त्यांनी सांगितली.
रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असलेले नाते डॉ. सतीश देसाई यांनी उलगडले. रवी चौधरी, जयराम देसाई, सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ, वि. दा. पिंगळे, उद्धव कानडे, अभय जबडे, डॉ. मेधा सिधये, दीपक करंदीकर, डॉ. नीलिमा गुंडी, संजय नहार, दत्ता हलसगीकर, श्रीधर कसबेकर, डॉ. बुधाजीराव मुळीक, राजन लाखे, सुरेशचंद्र पाध्ये, अविनाश पायगुडे, राजीव बर्वे, बंडा जोशी, श्रीकृष्ण पुरंदरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांमध्ये भारती पांडे, नंदा सुर्वे, प्रा. प्र. ना. परांजपे, लीला गांधी यांचा समावेश होता.
प्रकाश पायगुडे स्मृती पुरस्कार
प्रा. प्र. ना. परांजपे यांनी पायगुडे यांच्या नावाने साहित्य परिषदेतील उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास यावर्षीपासून पाच हजार रुपयांचा पुरस्कार दिला जावा अशी इच्छा व्यक्त केली असल्याचे प्रा. जोशी यांनी घोषित केले. या वर्षीपासून परिषदेच्या वर्धापनदिन समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे असे जोशी यांनी सांगितले.
