देशाच्या आर्थिक विकासात सहकारी बँकांचे योगदान महत्त्वाचे – सतीश मराठे
पुणे – जनता सहकारी बँकेतर्फे राष्ट्रीय सहकार सप्ताह आणि बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सहकारी बँकांच्या परिषदेमध्ये’भारताची आर्थिक सद्यस्थिती आणि नागरी सहकारी बँकांची भूमिका’ या विषयावर चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन डीपी रस्त्यावरील घरकुल लॉन्स येथे करण्यात आले. व्यासपीठावर जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप, उपाध्यक्ष अलका पेटकर यावेळी उपस्थित होते.
ज्येष्ठ बँकिंग तज्ञ जयंत काकतकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र अर्बन को-आॅपरेटिव्ह बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा वैशाली आवाडे, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, एन के जी एस बी बँकेच्या अध्यक्ष हिमांगी नाडकर्णी, सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे आदी या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते.
केंद्रीय पातळीवर स्वतंत्र सहकार मंत्रालय सुरू झाल्यापासून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेचा सहकारी बँकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक झालेला आहे. सहकारी बँका या केवळ देशाच्या आर्थिक विकासातच नव्हे तर सर्वसामान्यांना आर्थिक आधार देण्याचे काम करतात. देशाची अर्थव्यवस्था पुढील दोन वर्षात पाच ट्रिलियन होणार आहे .यामध्ये देशातील सहकारी बँकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे मत रिझर्व बँक आॅफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले.
सतीश मराठे म्हणाले, सहकारी बँकांवर बंधने आणून छोट्या बँका बंद करण्याचे कोणतेही धोरण रिझर्व बँकेचे नाही. बदलत्या काळामध्ये सहकारी बँकांना राष्ट्रीयकृत तसेच खाजगी बँकांशी मोठी स्पर्धा करावी लागणार आहे. यामध्ये काळा बरोबर सहकारी बँकांनी तंत्रज्ञान आत्मसात करून आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता आणणे, सायबर सिक्युरिटी सुरक्षा अधिक सक्षम करणे यावर भर दिला पाहिजे.
जगदीश कश्यप म्हणाले, सहकार्य यशोधनम या बँकेच्या ब्रीदवाक्य नुसारच बँकेची वाटचाल अत्यंत यशस्वीरित्या सुरू आहे. सहकारी बँकांनी एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांशी सहकार्य केले, तर अधिक वेगाने विकास होऊ शकतो. ‘विना सहकार नही उद्धार’ यानुसार सहकारी बँकांनी देशाच्या विकासामध्ये एकत्र येऊन अधिक व्यापक प्रमाणात योगदान दिले पाहिजे.
अलका पेटकर म्हणाल्या, बदलत्या काळानुसार विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे येत्या काळामध्ये सायबर सिक्युरिटी हे सहकारी बँकांसमोरील मोठ्या आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सहकारी बँकांनी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे.
विद्याधर अनास्कर म्हणाले, ग्राहक जेव्हा छोटा असतो तेव्हा तो सहकारी बँकांमधून व्यवहार करतो, परंतु काही काळानंतर त्याचा व्यवहार वाढला की त्याचा ओढा हा खाजगी आणि राष्ट्रीयकृत बँकांकडे जातो. त्यामुळे सहकारी बँकांनी हा ग्राहक सहकारी बंकेमध्येच राहील व त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण होतील, त्यासाठी सहकारी बँकांनी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजे.
मिलिंद काळे म्हणाले, सहकारी बँकांवर सर्वसामान्यांचा पूर्ण विश्वास आहे, हे आपणच लोकांना सांगितले पाहिजे. विश्वास वाढला तरच सहकारी बँकांमधील डिपॉझिट वाढते आणि एकूण बँकिंग व्यवसाय अधिक मजबूत होऊ शकेल.
वैशाली आवाडे म्हणाल्या, सहकारी बँका या मुख्यत: ग्रामीण भागातील व्यवसाय आणि शेतीला पूरक अशा व्यवसायांना आर्थिक सहकार्य करतात. सहकारी बँका मजबूत झाल्या तर ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक गतिशील होऊ शकेल. त्यासाठी रिझर्व बँक आणि केंद्र सरकारने सहकारी बँकांना अधिक मदत केली पाहिजे.
सुभाष मोहिते म्हणाले राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत सहकारी बँका या ग्रामीण भागामध्ये अधिक पसरलेल्या आहेत. सर्वसामान्य माणूस हा पैशाने तसेच भावनेने ही त्या बँकांची जोडला गेलेला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम सहकारी बँकांनी केले आहे.
हिमांगी नाडकर्णी म्हणाल्या, इतर बँकांमध्ये घोटाळे झाले तर त्यांच्यावर कारवाई होत नाही. परंतु सहकारी बँकांवर मात्र त्वरित कारवाई होते आणि मोठ्या प्रमाणावर बंधने आणले जातात. त्यामुळे सर्वसामान्यांचा सहकारी बँकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, ही परिस्थिती बदलण्यासाठी रिझर्व बँकेने सहकारी बँकांना घातलेली बंधने शिथिल केली पाहिजेत आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे.
शरद गांगल म्हणाले, वेगळे सहकार मंत्रालय निर्माण झाल्यापासून रिझर्व बँकेचा सहकारी बँकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक झालेला आहे, याचा फायदा घेऊन सर्व सहकारी बँकांनी एकत्रित येऊन व्यवसाय वाढीवर भर दिला पाहिजे. तसेच सहकार बँकांनी तंत्रज्ञानाचा वापर वाढवून सायबर सिक्युरिटी अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ बँकिंग तज्ञ जयंत काकतकर यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले. बँकेचे संचालक अमित घैसास यांनी आभार मानले. चर्चासत्रात ३७ नागरी सहकारी बँकांतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक, असे १५० मान्यवर उपस्थित होते.