fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

पुणे जिल्ह्यात महारेशीम अभियानाचा शुभारंभ

पुणे १: शेतकऱ्यांना रेशीम शेतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि रेशीम शेतीचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यात येत असून या अभियानाचा शुभारंभ पुणे विभागीय कृषी सहसंचालक रफीक नाईकवाडी आणि प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या सहसंचालक डॉ.कविता देशपांडे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला.

राज्यात प्रथमच जिल्हा परिषद, रेशीम संचालनालय आणि राज्याचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महारेशीम अभियान राबविले जाणार असून या काळात जिल्ह्यामध्ये नव्याने रेशीम शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.

राज्यात एकराच्या रेशीम शेतीतून अनेक शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न घेतले असून शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्याचे सामर्थ्य रेशीम शेतीमध्ये असल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे असे आवाहन श्री.नाईकवाडी यांनी यावेळी केले.

डॉ. देशपांडे म्हणाल्या, सुशिक्षित बेरोजगार शेतकरी युवकांनी नोकरीच्या मागे न धावता रेशीम शेतीकडे वळावे. बारामती येथे शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या कोषांची खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांना कोष विक्रीकरिता कर्नाटकात जायची आवश्यकता यापुढे असणार नाही.

जिल्ह्यात महिनाभर चालणाऱ्या महरेशिम अभियान कालावधीत अधिकाधिक शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करण्याकरिता जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी संजय फुले यांनी केले.

कार्यक्रमाला आत्माचे प्रकल्प अधिकारी विजय हिरेमठ, अधीक्षक कृषी अधिकारी सिताराम कोलते, जिल्हा रेशीम कार्यालयातील वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक संदीप आगवणे, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक आर.टी.पाटील, क्षेत्र सहाय्यक एस.एस. मैडकर, रिअरिंग ऑपरेटिव्ह एस.आर. तापकीर आणि अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
***

Leave a Reply

%d