fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

चाकांच्या खुर्चीवरील दिव्यांग सैनिकांच्या शौर्याला पुणेकरांचा सलाम

पुणे : निधडया छातीने देशाच्या सिमेवर शत्रूंच्या गोळ्यांचा सामना करताना अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या शौर्याला पुणेकरांनी सलाम केला. ‘आम्ही कायमच तुमच्यासोबत आहोत’, असा विश्वास देत चाकांच्या खुर्चीवर आपले संपूर्ण आयुष्य धैर्याने जगणा-या सैनिकांसोबत आगळीवेगळी भाऊबीज साजरी करण्यात आली. बहिणींनी प्रेमाने सैनिकांना औक्षण करण्यासोबतच पेढ्याचा घास भरवतानाचे दृश्य पाहताना उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

निमित्त होते, सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांतर्फे खडकी येथील अपंग सैनिक पुर्नवसन केंद्रांतील सैनिकांसाठी आयोजित भाऊबीज या कार्यक्रमाचे. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय खेळाडू निशा अंबिके, शतकवीर रक्तदात्या मुक्ता पुरंदरे, अभिनेत्री प्रतिभा दाते, गायिका भाग्यश्री घारपुरे, जागृती परिवाराचे मुकुंद जोशी, ज्ञानप्रबोधिनीच्या आर्या जोशी, केंद्राचे प्रमुख डाॅ. पी. आर. मुखर्जी, कर्नल बी.एल.भार्गव, सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ, गिरीश पोटफोडे आदी उपस्थित होते.

पी.आर.मुखर्जी म्हणाले, अपंगत्व आल्यानंतर सैनिकांचे पुढील आयुष्य अवघड असते. त्यामुळे सैनिकांसमवेत सण उत्सव साजरे केल्याने त्यांचे मनोेबल वाढते. अपंगत्व आले तरीही प्रत्येक सैनिकांमधील सकारात्मकता मोठी असते. कोणत्याही संकटाला ते धैर्याने सामोरे जातात. केवळ सैनिकच देशसेवा करतात असे नाही. तर देशातील प्रत्येकजण आपापल्यापरीने आपल्या क्षेत्रात योगदान देऊन देशसेवाच करीत असतो.

आनंद सराफ म्हणाले, केंद्रामध्ये वयवर्षे २२ ते ८४ वर्षांचे जवान आहेत. या जवानांना आरोग्य सुरक्षा आणि रोजगार प्रशिक्षण मिळवून देण्यासोबतच त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न असतो. आपल्या सण-उत्सवांच्या माध्यमातून जवानांना आनंद देत, आम्ही तुमच्यासोबत आहोत, हा विश्वास त्यांना देण्याकरिता उपक्रमाचे आयोजन सातत्याने केले जाते. दिव्यांग सैनिकांना समाजासोबत जोडण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याणी सराफ, अमोल काळे, सुभाष चव्हाण, स्मिता गिरमे, योगिता गवस यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहाय्य केले.

Leave a Reply

%d