सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या मागण्यासंदर्भात नवीन कार्यप्रणाली विकसित करणार
पुणे :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने शनिवार दिनांक १८ नोव्हेंबेर रोजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्यासोबत सुसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व संघटनांचे वैचारिक स्वातंत्र्य अबाधित राखून विद्यापीठाशी
संलग्नित असलेले त्यांचे प्रश्न मार्गस्थ करण्यासाठी नवीन कार्यप्रणाली करण्याचे ठरले. लोकशाही मार्गाने विद्यापीठातल्या विविध प्रश्नांबाबत विविध संघटनांमार्फत होणारी आंदोलने,सभा,कार्यक्रम आदींसाठी सर्वसंमतीने कार्यप्रणाली विकसित करण्याचे ठरविण्यात आले.
विद्यापीठाचे प्र- कुलगुरु डॉ. पराग काळकर यांनी या बैठकीचे प्रास्ताविक केले. कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी मागील परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये सहभागी होताना विद्यापीठाची प्रतिमा कशी उंचावेल यासाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.
अतिरिक्त सहायक पोलिस आयुक्त रंजन शर्मा यांनी विद्यार्थ्याना कायद्याच्या चौकटीत राहून सर्व प्रक्रियांचे पालन केल्यास पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करणार नसल्याची हमी दिली. पुणे शहराचे पोलीस आयुक्त रीतेशकुमार यांनी विद्यार्थ्यांवर आंदोलन तसेच अनुचित प्रकारच्या मार्फत गुन्हे दाखल करण्याची पोलिसांची इच्छा नसतानाही काहीवेळा अपरिहार्य कारणामुळे गुन्हे दाखल करण्याची वेळ येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी घेऊनच लोकशाही मार्गाने यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. तसेच विद्यार्थी व कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
माजी पोलीस सहसंचालक जयंत उमराणीकर यांनी त्यांच्या अनुभवाचा दाखला देत विद्यार्थ्याना प्रश्नाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला. तसेच विद्यार्थ्यांशी निगडित असलेल्या कार्यप्रणालीत सर्व प्रतिनिधींचा समावेश करून सर्वसमावेशक कार्यप्रणाली विकसित करण्याचे आश्वासन दिले.
विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ विजय खरे यांनी बैठकीचा समारोप करून विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. ही बैठक दिवाळीच्या औचित्याने आयोजित केली असल्यामुळे बैठकीनंतर सर्व संघटनांच्या प्रतिनिधींसाठी दिवाळी फराळ ठेवण्यात आला होता. या बैठकीस सर्व संघटनांच्या दीडशेहून अधिक प्रतिनिधी यांच्यासोबतच व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, डॉ. नितिन घोरपडे, डॉ. देविदास वायदंडे,बागेश्री मंठाळकर, तसेच अधिसभा सदस्य प्रसेनजित फडणवीस, पोलीस अधिकारी व कर्मचारी,विद्यापीठाचे सुरक्षा संचालक सुरेश भोसले व सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते
विद्यार्थी हा शैक्षणिक संकुलाचा कणा आहे आणि त्यांच्या सोबतच्या समन्वयानेच विद्यापीठाची भविष्यात प्रगती होणार आहे.
– कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी
शिक्षण आणि संघटन महत्वाचे जरी असले तरी कायदा व सुव्यवस्था राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
– पोलीस आयुक्त रितेशकुमार