fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNETOP NEWS

आशया सोबतच रुपाची मोकळीक असणाऱ्या लोकशाहीवादी रंगभूमीची आज गरज – ज्येष्ठ नाटककार राजीव नाईक यांचे प्रतिपादन

 

पुणे: ज्या रंगभूमीवर सर्व प्रकारची नाटके सर्व ठिकाणी करण्याची परवानगी असेल, आपले विचार, आशय हे रूपाच्या मोकळेपणाने मांडण्याची मोकळीक असेल अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणाऱ्या लोकशाहीवादी रंगभूमीची आज आपल्याला गरज आहे, असे प्रतिपादन संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ नाटककार राजीव नाईक यांनी केले.

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांनी स्थापन केलेले रूपवेध प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा यावर्षीचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार आज डॉ लागू यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत रंगकर्मी लकी गुप्ता यांना राजीव नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी नाईक बोलत होते. टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील ज्योत्स्ना भोळे सभागृह संकुल याठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला. रोख रुपये ७५ हजार आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे अध्यक्ष डॉ मोहन आगाशे, कार्याध्यक्ष एस पी कुलकर्णी, श्रीमती दीपा लागू, डॉ आनंद लागू, राजेश देशमुख, शुभांगी दामले, सेंटरचे सभासद व अनेक कलाकार यावेळी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू कुटुंबीय यांच्या पुढाकाराने नव्याने उभारण्यात येत असलेल्या श्रीराम लागू रंगअवकाशाबद्दल आणि भारतीय रंगभूमीविषयी राजीव नाईक यांचे भाषणही संपन्न झाले.

लकी गुप्ता यांनी ‘थिएटर ऑन व्हील्स’ या संकल्पनेतून भारतभर भ्रमण करून आठशेहून अधिक ठिकाणी विविध एकल नाटके सादर केली आहेत. त्यांनी सादर केलेल्या नाटकांची प्रयोगसंख्या काही हजारांच्या घरात आहे. ‘माँ, मुझे टागोर बना दे’ या नाटकाचा १३०६ वा प्रयोग त्यांनी यावेळी कार्यक्रमानंतर सादर केला.

लोकशाहीवादी रंगभूमीबद्दल आपले विचार मांडताना नाईक म्हणाले, “या रंगभूमीवर द्वेष न करता समोरच्याचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न महत्त्वाचा आहे. प्रेक्षकांना जसा टीका करण्याचा हक्क आहे तशी त्यांच्यावर अभ्यास करण्याची जबाबदारी आहे याचे भान ही रंगभूमी देईल. आशायासोबतच रुपाची मोकळीक येथे महत्त्वाची ठरेल. टीका करताना समोरच्यामध्ये जे काही सर्वोत्तम आहे ते आत्मसाद करायची तयारी या ठिकाणी असेल.”

लोकशाहीवादी रंगभूमीच्या या प्रयोगाने सर्व प्रकारच्या रंगभूमीचे सर्व आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. सर्वांना त्यांच्या त्यांच्या प्रकारची हवी तशी नाटके करता येतील, कादंबऱ्या लिहिता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकशाहीवादी रंगभूमी ही केवळ बहुसंख्यांकांची रंगभूमी असता कामा नये. लोकशाहीवादी समाजाप्रमाणेच यामध्ये देखील वेगळा विचार करणाऱ्या अल्पसंख्यांकांना स्थान असायला हवे, मान असायला हवा आणि त्यांचा तो मान इतरांनीही राखायला हवा. रूप आणि आशय या दोहोंना यामध्ये योग्य स्थान असावे. या रंगभूमीवर तुम्हाला तुमचे म्हणणे मांडण्याचा आणि विरोध दर्शविण्याचाही अधिकार हवा. लोकशाहीमध्ये, नाटकामध्ये विरोध करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, फक्त तो संविधानाला धरून असायला हवा. जर तो संविधानात बसत असेल तर तो लोकशाहीवादी ठरतो. जर एखादी विचारसारणी मान्य नसेल तरी ते विचार ऐकून घेण्याची तयारी हवी, याकडे नाईक यांनी लक्ष वेधले.

या रंगभूमीवर गांधीवादी, सावरकरवादी, माक्सवादी सर्वांना आपले विचार मांडता येतील आणि प्रेक्षकांनाही ते ऐकून आपली मते ठरविता येतील. कोणतीही भूमिका घेताना इतरांच्या भूमिकांचा देखील येथे आदर होईल. सादरीकरणावर टीका- विवेचन हे व्हायलाच हवे, असेही नाईक म्हणाले.

अनेकदा आज जे नाकारले जाते ते नजीकच्या भविष्यात प्रयोगशील होतयं असा अनुभव येतोय. संगीत नाटके ही याची उत्तम उदाहरणे आहेत असे मत नाईक यांनी मांडले.

या पुरस्काराने पुढे जाण्याची प्रेरणा दिली असे यावेळी लकी गुप्ता यांनी सांगितले. डॉ मोहन आगाशे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर राजेश देशमुख यांनी आभार मानले. गौरी लागू यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ आनंद लागू यांनी कार्यक्रमाची संकल्पना सांगत मनोगत व्यक्त केले. शुभांगी दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d