fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsMAHARASHTRA

‘ध्यास सन्मान’ पुरस्कारांच्या वितरणाने सुगंधी झाली ‘गगन सदन तेजोमय’ची दिवाळी पहाट!

मुंबई : ‘आपल्या ताटातला एक छोटासा घास, दुसऱ्याच्या ओठी लावण्याचा छोटासा प्रयत्न ‘अॅड फिझ’चे विनोद पवार आणि महेंद्र पवार गेली १९ वर्षे घ्यास सन्मान देऊन करीत आहेत. वेगळ्या पद्धतीने समाज धुरिणींचे कार्य पाहून, त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी ‘गगन सदन तेजोमय’चे पवित्र व्यासपीठ कायम त्यांच्या कार्याची दखल घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करीत आहे. यावर्षी अत्यंत वेगळे कार्य सातत्यमय करणाऱ्या ‘नाट्यपराग’ आणि ‘पराग प्रतिष्ठान’ तसेच ‘विवेकानंद व्याख्यानमाला’ राबविणाऱ्या ‘विद्यार्थी उत्कर्ष मंडळ’ यांचा ध्यास सन्मानाने छत्रपती शिवाजी महाराज पार्क मुंबई येथील सावरकर स्मारक येथे गौरव करण्यात आला.

समाजाचे ऋण फेडण्यासाठी ‘अॅड फिझ’च्या परंपरेनुसार सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात गेली ४६ वर्षे कर्तव्य, जाणीव, ध्येय, ध्यास  आणि सातत्य यासाठी माणसांची आणि मनांची चळवळ उभारणाऱ्या ‘नाट्यपराग’ आणि ‘पराग प्रतिष्ठान’, तसेच चिंचपोकळी मुंबईतील कामगार वस्तीत ‘विवेकानंद व्याख्यानमाला’ या सारखे उपक्रम रावबून, विविध क्षेत्रातील नामवंतांचे विचार आणि प्रबोधन तिसऱ्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा वसा घेतलेल्या ‘विद्यार्थी उत्कर्ष मंडळ’ या संस्थांचा सन्मान आजच्या ‘गगन सदन तेजोमय’मध्ये डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आला. यासोबतच विविध प्रकारची तालवाद्य वाजवून सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले – देवगाव प्राथमिक शाळेचा आदिवासी शाळकरी विद्यार्थी आर्यन भांगरे याचा त्याच्या बालवयातील कलागुणांना प्रोत्साहन म्हणून विशेष गौरव करण्यात आला. या मंगलप्रसंगी आघाडीचे डोलकीपटू विजय चव्हाण यांच्यासोबत आर्यनची जुगलबंदी सादर करून एक अभिनव प्रयोग रंगला. १३ वर्षांचा आर्यन आणि तालमणी म्हणून ख्यात विजय चव्हाण यांच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले होते.

प्रसिद्ध युवा गायिका दीपिका भिडे – भागवत यांच्या उप-शास्त्रीय भक्ती संगीत कार्यक्रमाने आज ‘गगन सदन तेजोयम’ची दिवाळी पहाट सुरु झाली. ‘राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी’ ह्या भागवत संप्रदाच्या मंत्राने ही दिवाळी पहाट मंगलमय  झाली. त्यानंतर ‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी’, ‘आनंदाचा कंद हरि हा देवकि नंदन पाहिला’, ‘गोविंद गोविंद मना लागलिया छंद’, ‘श्रीअनंता मधुसूदना, पद्मनाभ नारायणा’, ‘तुज पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी’ अश्या अवीट गोडीच्या तुकोबांच्या अभंगांची दिव्य अनुभूती रसिकांनी दीपिका भिडे यांच्या स्वरांतून अनुभवली. विलक्षण चैतन्यमय बंदिशी सादर करून त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली होती. या कार्यक्रमाची संकल्पना अत्यंत वेगळी होती. ‘आनंदाचा कंद’ असं शीर्षक असलेल्या या कार्यक्रमात संत तुकारामांच्या अभंग रचना सादर करण्यात आल्या. अत्यंत विलोभनीय आणि लालित्यमय निरूपण डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांनी केले.

‘ध्यास सन्मान’ पुरस्कारांचे वितरण डॉ. विनय सहस्रबुद्धे, सुजय पत्की, डॉ. नीना सावंत व अॅड. संजीव सावंत, एलआयसीच्या शिल्पा सापळे, कला दिग्दर्शक गोपी कुकडे, साईनिर्णयचे महेश खर्द, सुदेश हिंगलासपूरकर, विनायक गवांदे, डॉ. माधुरी गवांदे इत्यादी प्रभुतींच्या हस्ते व उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाला तबला : यती भागवत, हार्मोनियम : अनंत जोशी, पखवाज : हनुमंत रावडे, साईड रिदम : श्वेत देवरूखकर, कोरस : गौरी रिसबूड, शर्वरी पेंडसे यांनी दिला होता.

Leave a Reply

%d