मुग्धा वाव्हळ हिला माॅडर्न पेंटॅथलाॅन मध्ये ४ सुवर्ण
पुणे : गोवा येथे झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये मुग्धा वाव्हळ हिने सहा पदक प्राप्त केले आहेत. महाराष्ट्र संघातर्फे खेळताना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदार्पणातच मुग्धाने सुवर्णपदकाचा चौकार मारला आहे. तिने पेंटाथलॉन खेळात चार सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य पदक पटकाविले आहे.
मुग्धाला मॉडर्न पेंटाथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस विठ्ठल शिरगावकर आणि सुनिल पूर्णपात्रे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
मॉडर्न पेंटॅथलाॅन क्रिडा प्रकारातील ट्रेट्राथलॉन म्हणजे पोहणे, तलवारबाजी, नेमबाजी व धावणे. या ट्रेट्राथलॉनमध्ये वैयक्तिक, मिक्स रिले ( मयंक चापेकर व मुग्धा वाव्हळ ), मुलींचे सांघिक (मुग्धा वाव्हळ, श्रुती गोडसे, अहिल्या चव्हाण) असे तीनही गोल्ड मेडल मुग्धाने जिंकले आहेत. त्याचबरोबर ट्रायथल या क्रिडा प्रकारात धावणे, नेमबाजी, पोहणे यामध्ये तिने वैयक्तिक कांस्यपदक पटकावले आहे. लेझर रन या क्रिडाप्रकारात धावणे व नेमबाजी याचा एकत्र समावेश असतो. आत मुग्धाने सांघिक रौप्य पदक प्राप्त केले आहे.
मुग्धाने मॉर्डन पेंटाथलॉन क्रिडाप्रकारातील बायथले, ट्रायथले व लेझर रन या खेळांमधील फेडरेशनच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धामध्ये २०१७, ते २०२३ दरम्यान सलग ६ वर्षे पदक प्राप्त केलेले आहेत.
अभियंता असलेले मुग्धाचे वडील महेश वाव्हळ स्वतःचा व्यवसाय सांभाळून तिच्यासोबत सरावाकडे कटाक्षाने लक्ष देतात. मॉर्डन पेंटॅथलॉन खेळाची व योग प्रशिक्षक असलेल्या मुग्धाची आई हर्षदा वाव्हळ याही तिला मार्गदर्शन करतात. पिंपरी चिंचवडमध्ये बारावीमध्ये मुग्धा शिकत आहे. मुग्धाला पुढील काळात भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिंपिक मध्ये पदक प्राप्त करायचे आहे.