भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत आकाश ठोसर मैदानात
आपल्या आरोग्यासाठी फिटनेसला जवळ करणे जसे महत्वाचे असते, तसेच आपल्या देशाच्या आरोग्यासाठी भ्रष्टाचारला दूर ठेवणे आवश्यक असल्याचे मत सैराट फेम लोकप्रिय अभिनेता आकाश ठोसर याने व्यक्त केले.
मुंबईत भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्यासाठी वाॅकेथाॅन आयोजित करण्यात आली होती. यावेळी आकाश म्हणाला, “भ्रष्टाचारविरोधात बोलायला हवं, छोट्या-छोट्या पावलांनीच सुरुवात होते, याविषयी बोललं पाहिजे. जमेल तिथे आवाज उठवला पाहिजे. फिटनेसच्या माध्यमातून केलेल्या या जनजागृतीमुळे नक्कीच फायदा होईल आणि अनेकजण सजग होतील.” अगदी पाहाटे पहाटे आलेल्या मुंबईकर मंडळींसोबत आकाशने मरीन ड्राईव्ह इथे मनसोक्त फोटो सेशनही केले. आपण लवकरच बहुचर्चित बाल शिवाजी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं आकाशने यावेळी सांगितले. यावेळी बोलताना आकाश फिटनेसबद्दलही। भरभरून बोलला. आपण प्रत्येकाने शरीराची काळजी घ्यायलाच हवी आणि त्यासाठी दररोज किमान एक तास व्यायामासाठी द्यायला हवा असे आकाशने सांगितले. एकूणच जनजागृतीबद्दल आयोजित केलेल्या या वॉकेथॉनला फिटनेस फंडा आवडीने जपणाऱ्या आकाशच्या उपस्थिती ने सर्वांचाच उत्साह वाढलेला दिसला.
