अबालवृद्धांच्या रॅम्पवॉकमधून घडले खादी परंपरेचे दर्शन
पुणे : अकरा महिन्याची चिमुकली, दोन वर्षांचा चिमुकला, सत्तर वर्षांची आजी, नटून-सजून आलेल्या तरुण व मध्यमवयीन सुंदर ललना, मराठमोळा साज आणि त्याला साजेशा अदाकारीची जोड देत केलेल्या रॅम्पवॉकने खादी व महाराष्ट्रीयन परंपरेचे दर्शन घडले. वंचित विकासच्या प्रकल्पांतर्गत वस्ती पातळीवरील महिला, ज्येष्ठ महिला, वंचित विकास परिवारातील शहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते यांनी रॅम्पवॉक करत उपस्थितांची मने जिंकली.
निमित्त होते, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ प्रायोजित व वंचित विकास आयोजित खादीच्या प्रसारासाठी फॅशन शोचे! म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे आयोजित ‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ या कार्यक्रमात खादीच्या प्रसारासाठी खास फॅशन शोचे आयोजन केले होते. सर्व वयोगटातील महिला व पुरुषांनी आकर्षकपणे रॅम्प वॉक करत आपली कला सादर केली.
या फॅशन शोमध्ये विजेता होण्याचा मान कमला खाटपे, डॉ. माधवी चीडगोपकर, शाहीन खान, रुपाली अभंग, चांदनी तांदळे, तनुजा कांबळे, सुरज होनकळस, सार्थक नागवंशी, नील देशपांडे यांनी पटकवला. स्नेहल जाधव, गौरी कदम यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले. कोरियोग्राफर मोहित पोटे आणि सहकार्यांनी भारताच्या चांद्रयान तीन या सफल अवकाश प्रक्षेणावर आधारित मनमोहक नृत्य सादर केले. सूत्रसंचालन अर्चना कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजस्विनी थिटे यांच्यासह वंचित विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी मनीषा समर्थ, राजेश्वरी नवले, ऍड. इंद्रजित डोंगरे, भोलाशेठ वांजळे, विजय जगदाळे व वंचित विकासचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. कुसुमवत्सल्य फौंडेशनच्या वैशाली पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.