Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

सांगीतिक वारसदारांकडून पंडित राम मराठे यांच्या गायकीचे दर्शन

पुणे : चतुरस्र, घरंदाज शास्त्रीय ख्याल गायक, जोड रागांचे बादशाह, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते, गुरू, वाग्येयकार, संगीतकार पंडित राम मराठे यांची गायकी रसिकांनी आज नव्याने अनुभवली. पंडित मराठे यांच्या चार पिढ्यांमधील सांगीतिक वारसदारांचे सादरीकरण, दृक-श्राव्य चित्रफित तसेच दिग्गज कलाकारांच्या आठवणीतून पंडित मराठे यांचे बहुआयामी व्यक्तीमत्त्व उलगडले.
पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गानवर्धन, पुणे आणि संगीत भूषण पंडित राम मराठे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 3) ‌‘संगीत भूषण : एक संस्मरण’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन एस. एम. जोशी सभागृहात करण्यात आले होते. या सांगीतिक कार्यक्रमात पंडित मुकुंद मराठे, भाग्येश मराठे, स्वरांगी मराठे, मृणाल नाटेकर-भिडे, आदीश्री पोटे, राजेंद्र मणेरीकर यांचा सहभाग होता. माधव मोडक (तबला), संजय गोगटे (ऑर्गन), लीलाधर चक्रदेव (संवादिनी) यांनी साथसंगत केली. कलाकारांशी स्वाती मराठे यांनी संवाद साधला.
शुद्ध कल्याण रागातील ‌‘हे महादेव’ ही रचना सादर करून पंडित मुकुंद मराठे आणि भाग्येश मराठे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर पंडित मराठे यांची पणती आदिश्री पोटे हिने राग बिहागमधील ‌‘हे बालमवाँ’ ही बंदिश तर भाग्येश मराठे यांनी राग पूर्वामधील ‌‘चंचल चतुरा सुगार नारी’, मृणाल नाटेकर-भिडे यांनी राग मारवामधील ‌‘ओ गुणीजन’ ही बंदिश तर नात स्वरांगी मराठे हिने सादर केलेली ‌‘हरिची ऐकताच मुरली’ आणि ‌‘सोहम हर डमरू बाजे’ या रचना सादर करून पंडित मराठे यांच्या गायकीचे दर्शन घडवित युवा पिढीने जपलेला सांगीतिक वारसा अधोरेखित केला.
पंडित मराठे यांचे बालपण, संगीताविषयीची रुची अशा आठवणींना पंडित मुकुंद मराठे आणि स्वाती मराठे यांनी उजाळा दिला. उत्तम नकलाकार, समयसूचकता आणि जीवनाविषयी कमालीचा सकारात्मक दृष्टीकोन असणारे, जोड रागांचे बादशाह पंडित मराठे यांच्या विविध पैलूंचे शब्दचित्र मराठे कुटुंबियांनी रसिकांच्या मन:पटलावर उभे केले. मृणाल नाटेकर-भिडे, स्वरांगी मराठे आणि आदिश्री पोटे यांनी गुरू महिमेची महती सांगणारी ‌‘तपत जपत गुरू नाम’ आणि राग अभोगीमधील ‌‘देव देव महादेव’ या रचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
पंडित मराठे यांच्या डायरीतील लेखनाच्या संदर्भातून त्यांची संगीत क्षेत्रातील उर्जादायी वाटचाल, सतत नवीन शिकण्याची आस, नकलाकार म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा आयाम रसिकांसमोर आला. पंडित राम मराठे यांच्या गायकीतील बलस्थाने दाखविणारे संगीत मानापमान नाटकातील ‌‘युवती मना..’ हे नाट्यपद दृकश्राव्य माध्यमातून ऐकायला मिळाल्याने युवा पिढीतील श्रोतृवर्गाला नवी सांगीतिक दृष्टी मिळाली.
रुपक हिंडोल बहारमधील ‌‘अपने मायीरी आज’ ही बंदिश पंडित मुकुंद मराठे, भाग्येश्र मराठे आणि राजेंद्र मणेरिकर यांनी बहारदारपणे सादर केली.
प्रसाद सावकार, राजराम शिंदे, पंडित सुरेश तळवलकर यांनी पंडित राम मराठे यांच्याविषयी व्यक्त केलेली मनोगते दृकश्राव्य माध्यमातून ऐकविण्यात आली.
प्रास्ताविकात गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा सादर करीत कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. कलाकार आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सचिव रवींद्र दुर्वे, उपाध्यक्षा निलीमा राडकर, डॉ. राजश्री महाजनी यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading