Wednesday, June 10, 2026
Latest NewsSports

देशातील डॉक्टर्संचा सहभाग असलेल्या पहिल्या ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ राष्ट्रीय स्पर्धेचे पुण्यामध्ये आयोजन !!

पुणे : यंग डॉक्टर्सं लीग (वायडीएल) यांच्यावतीने देशातील एकूण एक हजारपेक्षा जास्त सहभाग असलेल्या पहिल्या ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ राष्ट्रीय स्पर्धेचे पुण्यामध्ये आयोजन करण्यात आले आहे. या भव्य-दिव्य स्पर्धेत विविध ११ राज्यातील डॉक्टर्स-खेळाडूंचा सहभाग असून सांघिक आणि वैयक्तिक अशा एकूण ११ क्रीडाप्रकारांचा समावेश आहे.

या ऑलिंपिक स्पर्धेविषयी पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती देताना ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ (आयडीएल) समितीचे अध्यक्ष डॉ. नचिकेत महींद्रकर आणि सचिव डॉ. अमित द्रविड यांनी सांगितले की, भारत देशातील कानाकोपर्‍यामध्ये असणार्‍या डॉक्टर्सना एकत्र आणणार्‍या या उल्लेखनीय आणि मैत्रीपूर्ण ऑलिंपिक स्पर्धेचे पुण्यामध्ये पहिल्यांदाच आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेव्दारे वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांना आपल्या क्रीडागुणांना दाखविण्याची संधी मिळणार असून या क्षेत्रातील सौहार्द वाढण्यास मदत होणार आहे. निरोगी आणि स्वाथ्यपूर्ण जीवनशैली याचे महत्व तसेच याचा प्रसार आणि प्रचार या स्पर्धेच्या निमित्ताने करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या ऑलिंपिक स्पर्धेमुळे विविध सांघिक आणि वैयक्तिक क्रीडांमध्ये डॉक्टरांचे कौशल्य, सर्मपण आणि गुणांना वाव मिळणार आहे. याशिवाय शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी अशा क्रीडास्पर्धेला अनन्यसाधारण महत्व आहे. या ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि थ्रो-बॉल हे सांघिक (टिम) खेळ तसेच बॅडमिंटन, टेनिस, अ‍ॅथलेटिक्स्, कॅरम, बुद्धीबळ, टेबल-टेनिस, लॉन-टेनिस असे वैयक्तिक क्रीडाप्रकार खेळविण्यात येणार आहेत, असे आयडीएल समितीचे सदस्य डॉ. नितीन गडकरी आणि डॉ. संदीप पाटील यांनी स्पष्ट केले.

स्पर्धेच्या सुयोग्य नियोजनासाठी समितीचे अध्यक्ष डॉ. नचिकेत महींद्रकर आणि सचिव डॉ. अमित द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. नितीन गडकरी, डॉ. संदीप पाटील, डॉ. राहूल पाटील, डॉ. अंकूश भंडारी, डॉ. वैभव दुधट यांच्यासह सुमारे २०० हून अधिक डॉक्टरांचा संघ स्पर्धेचे व्यवस्थापन पहाणार आहे. यामध्ये सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धा नियोजन, सांस्कृतिक कार्यक्रमाची जबाबदारी, समाजिक माध्यमे आणि माहिती-सुचना विभाग, प्रवास आणि हॉटेल, आदरतिथ्य व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या जबाबदार्‍या या समिती मार्फत केल्या जात आहेत.

‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ स्पर्धेचे सामने श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल-बालेवाडी, पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना क्लब, व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी-सिंहगड रोड, स्केलअप अ‍ॅकॅडमी मैदान-वारजे, डीएसके स्टार क्रिकेट अ‍ॅकॅडमी-धायरी आणि शिंदे हायस्कूल-सहकारनगर अशा विविध मैदानांवर होणार आहेत. या स्पर्धा ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये होणार आहेत.

वैयक्तिक स्पर्धांमध्ये विविध गटांचे सामने होणार आहेत. लॉन-टेनिस, टेबल-टेनिस, कॅरम आणि बॅडमिंटन या वैयक्तिक स्पर्धेत पुरूष एकेरी, दुहेरी गट, महिला एकेरी आणि दुहेरी गट, मिश्र दुहेरी गटांचे सामने आयोजित केले जाणार आहेत. अ‍ॅथलेटिक्स्मध्ये पुरूष आणि महिलांच्या १०० मी., २०० मी., ४०० मी., ८०० मी., रिले शर्यत, लांब उडी, गोळा फेक या स्पर्धा होणार आहेत. बुद्धीबळामध्ये महिला आणि पुरूष गट, जलतरणमध्ये महिला आणि पुरूष फ्रि स्टाईल, ब्रेस्टस्ट्रोक, बटरफ्लॉय आणि बॅकस्ट्रोक ५०, १०० आणि २०० मीटर शर्यत अशा वैयक्तिक गटाच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा ३५ वर्षांवरील, ३५ ते ५० वर्षांखालील, ५० ते ६० वर्षाखालील आणि ६० वर्षांवरील या वयोगटांमध्ये होणार आहेत.

सांघिक स्पर्धेत महिला आणि पुरूष क्रिकेट, पुरूषांच्या ६-अ-साईड फुटबॉल स्पर्धा, पुरूषांच्या व्हॉलीबॉल स्पर्धा, महिलांच्या थ्रो बॉल स्पर्धा या सांघिक स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहेत.

पहिल्यांदा होत असलेल्या या ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ स्पर्धेचा मान पुणे शहराला मिळाला आहे. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा, केरळ, पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू अशा विविध राज्यांतील डॉक्टर-खेळाडू सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील पुण्यासह मुंबई, ठाणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, बीड, लातूर, औरंगाबाद, रत्नागिरी, जळगांव, धुळे, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत, असे डॉ. नचिकेत महींद्रकर आणि डॉ. अमित द्रविड यांनी सांगितले.

या राष्ट्रीय ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ स्पर्धेला सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया-पुणे यांनी प्रायोजकत्व आणि पाठींबा दिला आहे. याशिवाय अ‍ॅशुअर स्किन अँड लेझर क्लिनिक, अ‍ॅरोबिंडो फार्मा, रूबी हॉल क्लिनिक, मेडीकव्हर हॉस्पिटल, स्किन अँड सर्जरी इंटरनॅशनल अँड नोबेल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुना डायग्नॉस्टिक सर्व्हिसेस यांनी सह-प्रायोजकत्व दिले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading