Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

 भौतिक प्रगती बरोबर मानसिक प्रगतीची गरज   माजी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांचे मत 

पुणे : आज जागतिक स्तरावर युद्धाचे गंभीर स्वरूप झाले आहे. धर्माचे विद्रुपीकरण होत आहे. ते थांबविण्याची जबाबदारी आपली आहे. आपण भैतिक प्रगती खूप केली आहे. आता मानसिक पातळीवर प्रगतीची गरज आहे. यासाठी माणुसकीने वागणायची गरज आहे, असे मत निवृत्त आयएएस माजी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी व्यक्त केले.

वल्लरी प्रकाशन संस्थेच्या वतीने मधुमालती या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार, प्राध्यापिका कीर्ती मुळीक, रामदास स्वामी अभ्यासक शरद कुबेर, ज्येष्ठ कवी म.भा. चव्हाण, मानसी चिटणीस, चैतन्य ज्ञानपीठाचे मुकुंद गोरे,  संपादक व्यंकटेश कल्याणकर, किरण इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वल्लरी मीडियाच्या वतीने चैतन्य ज्ञानपीठचे संस्थापक मुकुंदराव गोरे यांना पहिला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, उपरणे, शाल, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

उमाकांत दांगट म्हणाले, मनाची प्रगती करण्यासाठी रामदास स्वामी यांनी सांगितलेले मनाचे श्लोक अभ्यासले पाहिजेत. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, असे साने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने माणुसकीने वागण्याची गरज आहे. मनाची प्रगती झाली की अनेक समस्या सुटतील, असे ही त्यांनी सांगितले.

व्यंकटेश कल्याणकर म्हणाले,  आज मनावर संस्कार करणाऱ्या साहित्याची गरज आहे. आपल्या संतांनी मनावर संस्कार करणारे अनेक साहित्य लिहिले. त्यातील एक उत्तम उदाहरण म्हणजे रामदास स्वामी यांनी लिहिलेले मनाचे श्लोक हे आहे. मनावर संस्कार झाले की समाज आणखी प्रगत होईल.

समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांची आज समाजाला गरज असून त्यांच्या जालना जिल्ह्यातील जांब समर्थ या जन्मगावी भव्य असे चैतन्य ज्ञानपीठ उभारण्याचे कार्य मुकुंद गोरे यांनी हाती घेतले आहे. त्यांच्या माध्यमातून समर्थ विचार जगभरात पोहचणार असून त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असल्याबद्दल आनंद होत असल्याचे कल्याणकर यांनी सांगितले.
ज्योती इनामदार यांनी प्रस्तावना केली. प्रज्ञा कल्याणकर यांनी सूत्रसंचालन केले. नीळकंठ ताकबीडकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading