मुंबईत इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई : मुंबईतील गोरेगाव येथे पहाटे 3 वाजताच्या सुमारास एका इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. गोरेगाव पश्चिम येथील एमजी रोड मार्गावर असलेल्या समर्थ सृष्टी इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागली. या आगीमध्ये 14 जण गंभीर जखमी झाले असून यांतील 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आगीमध्ये 30 दुचाकी तर काही चार चाकी वाहने जळून खाक झाली आहेत. मध्यरात्रीच्या वेळी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत 30 जणांना सुखरुप इमारतीच्या बाहेर काढण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास समर्थ सृष्टी या इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागली. ग्राउंड प्लस पाच मजल्याची ही इमारत असून ही आग लेवल दोन प्रकारची असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत अडकलेल्या 30 पेक्षा अधिक नागरिकांना सुखरुप इमारतीच्या बाहेर काढण्यात आले आहे तर 14 जण या आगीमध्ये जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सात महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. दुर्दैवी बाब म्हणजे या घटनेत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ बाहेर काढून मुंबईच्या ट्रॉमा केअर आणि कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर लगेच या आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. काही वेळाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत तळमजल्यावर काही दुकाने आणि समोर पार्क असलेल्या गाड्या जळून खाक झाल्याची माहिती देखील मिळत आहे. या इमारतीतील नागरिक गाढ झोपेत असताना ही घटना घडल्याने त्यांना बाहेर पडण्यास उशीर झाला. त्यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आग लागण्याआधी पार्किंगच्या परिसरामध्ये मोठा ब्लास्ट झाला. ज्यानंतर इमारतीतील नागरिकांची एकच तारांबळ उडाली. आग लागल्यानंतर इमारतीतील काही नागरिकांनी इतर नागरिकांच्या घरांच्या बेल वाजवून त्यांना जागे केले आणि लवकर घराच्या बाहेर पडण्यास सांगितले. या पार्किंगमध्ये वाहने पार्क करण्याच्या व्यतिरिक्त भंगाराचे सामान आणि जुने कपडे देखील ठेवण्यात आले होते. ज्यामुळे या आगीने रौद्ररुप धारण केल्याचे सांगण्यात येत आहे.
