सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा चौथा पदवीप्रदान सोहळा उत्साहात संपन्न
पुणे : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, किवळेतर्फे चौथ्या दीक्षांत समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या समारंभात एकूण ५८८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.ह्या कार्यक्रमासाठी भारत फोर्ज लिमिटेडचे अध्य्क्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब नीलकंठ कल्याणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदरील कार्यक्रम हा विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न झाला. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. शां .ब मुजुमदार ह्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास नीती आयोगाचे माजी सचिव श्री. राजेश्वर राव हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते .तसेच सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र- कुलपती, डॉ. स्वाती मुजुमदार, आणि प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिउरकर, या समारंभास उपस्थित होते.
सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र- कुलपती, डॉ. स्वाती मुजुमदार विद्यापीठातील अध्यापनशास्त्राची माहिती देताना म्हणाल्या की, ” ७० टक्के प्रात्यक्षिक आणि ३० टक्के कौशल्य शिक्षणावर आमचा भर आहे .केवळ पारंपरिक शिक्षण पद्धतीचा अवलंब न करता नोकरीभिमुक आणि उद्योगांना लागणाऱ्या कौशल्यांवर आमचा अभ्यासक्रम बनविण्यात आलेला आहे”. तसेच त्यांनी यावेळेस उपस्थितांना विद्यापीठात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.
सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. शां .ब मुजुमदार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, “यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत नाविन्यपूर्ण गोष्टी जोपासणे आवश्यक आहे. नवनवीन उत्पादने, संपत्ती निर्मिती तसेच आपल्या राष्ट्राच्या प्रगतीकडे नेणाऱ्या नवकल्पनांवर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करायला हवे. हे तीन गुण विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यास नक्कीच महत्वपूर्ण ठरतील आणि खऱ्या देशभक्तीची भावना जागृत करतील.
भारत फोर्ज लिमिटेडचे अध्य्क्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब नीलकंठ कल्याणी ह्यांनी काळानुसार बदलत चालेल्या परिवर्तनशील घटकांबाबत आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, “विकसनशील जगामध्ये सतत नव्याने विकसित होत असलेले तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता ( एआय), जागतिक पातळीवरील डिजिटायझेशनचे रूपांतरण हे सर्व बदल लक्षात घेत भविष्यातील नवीन संधीसाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात गरजेचे आहे.” याप्रसंगी त्यांनी तरुणांना भविष्यासाठी तयार करण्यासाठी कौशल्य आधारित शिक्षणपद्धतीचा अवलंब करणाऱ्या एसएसपीयु सारख्या सुमारे ५००० कौशल्य विद्यापीठांची आवश्यकता व्यक्त केली.
बाबासाहेब नीलकंठ कल्याणी यांनी विद्यापीठात औद्योगिक भागीदारांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या मॅन्युफॅक्चरिंग डिप्लोमा आणि इंडस्ट्री 4.0 मध्ये पदविकाचे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. या पदविका अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून मुलींचा सहभाग बघून ते प्रभावित झाले. त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरणासाठी एसएसपीयुतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
नीती आयोगाचे माजी सचिव राजेश्वर राव विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, “अपयशाची भीती न बाळगता कठोर निर्णय घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्षम व्हावे. या वेगवान जगात स्पर्धात्मक राहण्यासाठी स्वतः मध्ये नेतृत्वगुण विकसित करावे” . तसेच नवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि घडामोडींसह अद्ययावत राहण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी एसएसपीयु दरवर्षी आत्मनिर्भर पुरस्कार प्रदान करते . विद्यापीठातील अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या आणि स्वतःचा नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरु करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी २ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यावर्षीचा आत्मनिर्भर पुरस्कार बी टेक – मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंगचा विद्यार्थी आयुष अग्रवाल आणि बीबीए रिटेल मॅनेजमेंट अँड ई कॉमर्सची विद्यार्थिनी प्रीती अग्रवाल ह्यांना प्रदान करण्यात आला.
तसेच ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात कौशल्ये आत्मसात केली आहेत आणि त्यांच्या करिअरची यशस्वी सुरुवात केली आहे अशापैकी एका सरस विद्यार्थ्यास विद्यापीठ ‘कुशल पुरस्कार प्रदान करते. यावर्षी दीक्षांत समारंभात कु. निखतपरुईन गुलाब शेख हिला ‘कुशल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
यावर्षीचे कुलपती सुवर्ण पदक बीबीए (लॉजिस्टिक ) चा विद्यार्थी सोहम भावेश चौहान आणि एमएससी ( न्यूट्रीशनल सायन्सेस अँड डायटेटिक्स ) ची विद्यार्थीनी भक्ती . एन . मुजुमदार ह्यांना प्रदान करण्यात आला.
