गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव देशाला एका धाग्यात गुंफून ठेवणारे
सदाशिव पेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे शताब्दी वर्ष सदाशिव पेठ भूषण आणि आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार प्रदान
पुणे : लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने १९१७ साली सदाशिव पेठेतील शिवाजी मंदिर येथे मंडळाची स्थापना झाली. तेव्हा लोकमान्य टिळक हे संपूर्ण देशाचे नेते होते. लोकमान्य टिळकांनी संपूर्ण भारताला एका धाग्यात गुंफून ठेवणारे गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव महाराष्ट्रातून सुरू झाले. आजही या दोन उत्सवांनी लोकांना समान धाग्यात बांधून ठेवले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
सदाशिव पेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री शिवाजी मंदिर यंदा शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे. उत्सवात सदाशिव पेठ भूषण पुरस्कार आणि आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शितोळे, मंडळाच्या माजी अध्यक्षा सुचित्रा बडगुजर, कुंदनकुमार साठे, सचिन रासकर, राजेंद्र बलकवडे, उत्सव प्रमुख तेजस बेंद्रे उपस्थित होते.
राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर नाईक, क्रिस्ना फाऊंडेशनचे राजेंद्र मुथा, दुर्गम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार जाधव यांना सदाशिव पेठ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, शिरीष मोहिते, संतोष फडतरे, रवींद्र पठारे, श्याम मानकर यांना आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आहे. ज्ञानेश्वरी, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डाॅ. पराग काळकर म्हणाले, पुण्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक आणि सामाजिक नसून खूप मोठी आर्थिक उलाढाल या माध्यमातून होत असते, हे उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
आनंद सराफ म्हणाले, गणेशोत्सवाची शाश्वत मूल्ये समाज देश आणि धर्मासाठी कार्यकर्ते घडवतात. अप्रत्यक्षरीत्या सामाजिक समरसता उत्सवातून साधली जाते. काळानुरुप उत्सवात बदल घडून येतात त्यामुळे इतक्या वर्षानंतरही हा उत्सव टिकून आहे.
पांडुरंग बलकवडे, महेश सूर्यवंशी, शिरीष मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र शितोळे यांनी प्रास्ताविक केले. सुचित्रा बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले.
