कांदा प्रश्नावर आजच निर्णय घ्या – शरद पवार
मुंबई : कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर लादण्यात आलेल्या 40 टक्के निर्यात शुल्कामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आजच्या आज कांदा प्रश्नावर तोडगा काढून निर्यात शुल्क मागे घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे.
शरद पवार म्हणाले, कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यांच्या कडील साठवलेला कांदा देखील खराब व्हायला सुरूवात झाली आहे. आताच कांदा व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ भेटीसाठी आले होते. 40 टक्के निर्यात शुल्क हा त्यांच्यावर अन्याय आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होत असून या बैठकीत (Piyush Goyal) हे उपस्थित असणार आहेत. पीयूष गोयल यांनी कांदा प्रश्नावर आजच निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
