शिवराज्याभिषेकामुळे हिंदवी स्वराज्य प्रस्थापित झाले सुधीर थोरात यांचे मत
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वी सुमारे ८०० वर्षे विविध प्रकारच्या परकीय आक्रमणामुळे हिंदू संस्कृती एक प्रकारे लयाला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वकीयांमधील आत्मविश्वास निर्माण करून त्यांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रवृत्त केले छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे शिवराज्याभिषेकामुळे हिंदवी साम्राज्यामध्ये रूपांतर झाले आणि हिंदवी स्वराज्य प्रस्थापित झाले, असे मत श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात यांनी व्यक्त केले.
शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मएसो सिनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव व्याख्यानमालेत सुधीर थोरात यांचे शिवराज्याभिषेक आणि त्याचे दूरगामी परिणाम या विषयावर व्याख्यान झाले त्यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, महाविद्यालय नियोजन समितीचे सदस्य डॉ. राजीव हजीरनिस, प्रोग्राम ऑफिसर अविनाश पगारे आदी यावेळी उपस्थित होते.
सुधीर थोरात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही मराठा सरदार हे औरंगजेबाशी निकराने लढू शकले. त्यांनी औरंगजेबाशी लढा दिल्यामुळे इतर हिंदुस्थानामध्ये हिंदू साम्राज्य निर्माण होण्यास मदत झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्य निर्माण केले नाही तर हिंदूंना संरक्षण दिले त्यातून हिंदू संस्कृती कशाप्रकारे विकसित होऊ शकेल यासाठी ही प्रयत्न केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अत्यंत बारकाईने तरुणांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यांच्या केवळ युद्धनीतीचा नव्हे तर व्यवस्थापन कौशल्य, भाषाशास्त्र या विविध अंगांचा अभ्यास केल्यास तरुणांना आजच्या काळामध्ये हिंदू समाजासोबत आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्यांना कशा प्रकारे तोंड देणे गरजेचे आहे याचे धडे घेता येतील, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा अभ्यास हा आजच्या प्रत्येक तरुणांनी करणे गरजेचे आहे, असेही सुधीर थोरात यांनी यावेळी सांगितले.
आदिती पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
