‘प्रोत्साहन’ : दिव्यांगांच्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन शनिवारपासून
पुणे : दिव्यांग व्यक्ती स्वावलंबी व्हाव्या, तसेच समाजाला त्यांच्यातील कौशल्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने पुण्यातील समविचारी मैत्रिणींनी एकत्र येऊन प्रोत्साहन २०२३ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शनिवार, दिनांक ३० सप्टेंबर ते रविवार, दिनांक १ आॅक्टोबर रोजी सकाळी १० ते ८ यावेळेत कर्वे रस्त्याजवळील अश्वमेध हॉल येथे हे प्रदर्शन होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील २८ दिव्यांग व्यक्ती आणि १२ संस्था या प्रदर्शनात सहभागी होत आहेत,अशी माहिती आयोजिका रेखा कानिटकर, रंजना आठल्ये यांनी दिली.
प्रदर्शनाचे संयोजन आरती पटवर्धन, माधुरी पाटणकर, गीता पटवर्धन या देखील करित आहेत.
प्रदर्शनाचे उद््घाटन शनिवार, दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अॅबिलिम्पिक्स रौप्यपदक पदक विजेत्या कर्णबधिर कलाशिक्षिका प्रियांका दबडे आणि भाग्यश्री नडिमेटला यांच्या हस्ते होणार आहे. फक्त दिव्यांग व्यक्तिंचाच सहभाग असलेल्या या प्रदर्शनात त्यांनी साकारलेल्या उपयुक्त कलात्मक वस्तू आणि खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन व विक्री केली जाते. त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.
रंजना आठल्ये म्हणाल्या, सन २००३ पासून हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले जाते. यावर्षी प्रदर्शनादरम्यान दृष्टीहिन वृद्ध महिला वायर बास्केट तयार करण्याचे तर शिर्डी साईबाबा संस्थेतील दृष्टीहीन मुली विविध वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत.
दिव्यांग व्यक्ती, त्यांच्यासाठी काम करणा-या संस्था आणि सामान्य नागरिक यांच्यात परस्पर संवाद व सहकार्य स्थापन करणे, हा या मागचा उद्देश आहे. दृष्टिहीन व्यक्ती आपले दैनंदिन आयुष्य कसे व्यतीत करत असतील याचे कौतुक आणि कुतूहल प्रत्येकाला असते. याबाबतीत त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. दिव्यांगाना सक्षम करणे हाच प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. प्रदर्शनाला प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठया संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
