Pune Festival : ‘व्हिंटेज स्कूटर रॅली’चे शानदार आयोजन
पुणे : ३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी यावर्षी देखील कायम राखले आहे. यंदाच्या पुणे फेस्टिव्हलमध्ये आज सकाळी ०८.३० वा. एक नवीन उत्सवी कार्यक्रम‘व्हिंटेज स्कूटर रॅली’आयोजित करण्यात आली. व्हिक्टरी थिएटर ईस्ट स्ट्रीट येथून सकाळी ८.३० वा. पुणे ग्रामीण पोलीस दलाचे डीसीपी मितेश गित्ते यांनी फ्लॅग ऑफ केला. यावेळी, संयोजिका जयू दारूखानवाला, भारतातील अव्वल दर्जाचे रेसिंग ड्रायव्हर संजय टकले, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड.अभय छाजेड, क्रीडा समितीचे समन्वयक प्रसन्न गोखले उपस्थित होते.
या रॅलीमध्ये १९६१ ते १९८४ अशा ५० – ६० वर्षांपूर्वी पुण्याच्या रस्त्यांवर धावणाऱ्या १३ स्कूटर्स सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये, वेस्पा, लॅबेंर्टा, एल.एम.एल आणि विजय सुपर आदी स्कूटर्सचा समावेश होता. त्यापैकी अनेक मूळ आकारात होत्या आणि इतर काळजीपूर्वक पुनर्संचयित केलेल्या होत्या ज्या पूर्व–निर्धारित रॅलीच्या मार्गावरून गेल्या.या रॅलीचा मार्ग पुण्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देत पुढे जाणारा होता. पुणे शहर १९६० ते १९८० या काळात आशिया खंडातील सर्वात मोठे स्कूटर निर्मिती केंद्र होते. किंबहुना पुण्याला ‘स्कूटर सिटी ऑफ इंडिया’ असे म्हंटले जायचे. त्या आठवणी जागवत या रॅलीचा मार्ग व्हिंटेज स्कूटर रॅली व्हिक्टरी थिएटर्स इथून सुरू होऊन
मेन स्ट्रीट, लाल देऊळ , जिपिओ ,वासवानी चौक, कौन्सिल हॉल, सरमाणिकशॉ रोड, वाॅर मेमोरियल, इंप्रेस गार्डन, सेंट पॅट्रीक्स चर्च या मार्गाने
द फर्न हॉटेल,अमनोरा,हडपसर येथे समाप्त झाला.
३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प आणि नॅशनल एग को–ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर, बढेकर ग्रुप आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.
