पुणे पीपल्स को. ऑप. बँकेचा १२ टक्के लाभांश जाहीर
पुणे : पुणे पीपल्स को.ऑप.बँक लि. पुणे या मल्टीस्टेट बँकेची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मार्केटयार्डमधील पुणे मर्चंट्स चेंबर व्यापार भवन येथे पार पडली. अहवाल वर्षासाठी सभासदांना १२% दराने लाभांश देण्याच्या संचालक मंडळाच्या शिफारशीला वार्षिक सर्वसाधारण सभेने एकमताने मंजुरी दिल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांनी दिली.
अॅड. सुभाष मोहिते म्हणाले, बँकेचे सध्या २१ शाखा व १ विस्तारीत कक्ष असून ३१ मार्च २०२३ या आर्थिक वर्षअखेर एकूण व्यवसाय २३१९.०५ कोटी चा टप्पा पार केला आहे. बँकेस एकूण १३.७७ कोटी निव्वळ नफा झाला आहे. बँकेचा निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के असून सीआरएआर १३.७७ एवढा आहे.
एटीएम सुविधा, सर्व शाखा संगणकीकृत ग्राहकांसाठी फंड ट्रान्सफर च्या आधुनिक सोईसुविधा ग्राहकांसाठी नविन अत्याधुनिक मोबाईल अॅप, अंतर्गत प्रशिक्षणासाठी स्वतःचे सुसज्ज प्रशिक्षण केंद्र यासाठी बँक कार्यरत आहे.
बँक नेहमीच सामाजिक हिताचे उपक्रम राबवत असून त्यामध्ये शाखांच्या वर्धापन दिनानिमित्त सभासदांसाठी आरोग्य तपासणी, आरोग्य शिबीरे, वारीला जाणा-या वारक-यांसाठी उपयुक्त वस्तुंचे वाटप, गणपती विसर्जन मिरवणुकीस पोलीस यंत्रणेस मदत, कामगार मेळावे असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. बँकेच्या सर्व शाखांमधून एकाच वेळी महिला दिन, डॉक्टर्स डे, सीए डे उपक्रम राबवित असते. बँकेच्या लवकरच नविन शाखा औरंगाबाद व शिरवळ येथे सुरु करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे परवानगी मागितली आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या सभासदांचे, खातेदारांचे व त्यांच्या पाल्यांचे बँकेतर्फे सन्मान करण्यात आले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार शेळके यांनी सभेचे संचालन केले व सभासदांनी विचारलेल्या शंकांचे निरसन बँकेचे ज्येष्ठ संचालक सीए जनार्दन रणदिवे यांनी केले. तसेच उपस्थितांचे आभार बँकेच्या उपाध्यक्षा वैशाली छाजेड यांनी मानले.
