पीएम विश्वकर्मा योजना आपल्या कारागीरांच्या कौशल्यात वाढ करेल- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांसाठी पीएम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केला. या कार्यक्रमात पीएम विश्वकर्मा बोधचिन्ह, ‘सम्मान, सामर्थ्य, समृद्धी’ या घोषवाक्याचे आणि पोर्टलचे देखील पंतप्रधानांनी उद्घाटन केले. कस्टमाईज्ड स्टँप शीट आणि टूलकिट बुकलेटचे देखील पंतप्रधानांनी यावेळी प्रकाशन केले. पंतप्रधानांनी 18 लाभार्थ्यांना विश्वकर्मा प्रमाणपत्रांचे वितरण केले. महाराष्ट्रामध्ये आज पाच ठिकाणी राज्यस्तरीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अशाच प्रकारच्या कार्यक्रमांचे मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन करण्यात आले. मुंबईमधील कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, पुण्यामध्ये राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, नाशिकमध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि छत्रपती संभाजीनगरमधील कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नागपूरमधील कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी 12 बलुतेदारांची तुलना भगवान विश्वकर्मा यांच्याशी केली आणि पारंपरिक कौशल्याचे जतन करण्यामध्ये त्यांची भूमिका अधोरेखित केली. पीएम विश्वकर्मा योजनेची त्यांनी प्रशंसा केली आणि या योजनेमुळे कारागीरांच्या कौशल्यात वाढ होईल असे नमूद केले. या कारागीरांच्या कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यावर त्यांनी भर दिला, ज्यामुळे त्यांच्या कौशल्याचेच केवळ जतन होणार नाही तर नव्या संधी होतील आणि निर्यातीला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्र्यांनी वस्त्रोद्योगाचे महत्त्व आणि विदर्भाच्या अर्थव्यवस्थेत बांबूच्या क्षमतेकडे लक्ष वेधले. या भागाचे आणखी सक्षमीकरण करण्यासाठी त्यांनी विदर्भात एका कौशल्य महाविद्यालयाच्या स्थापनेचे आवाहन केले.
प्राचीन काळात पारंपरिक कारागीरांनी भारतीय अर्थव्यवस्थेत प्रमुख भूमिका बजावली होती, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले. पीएम विश्वकर्मा योजनेमुळे हे कारागीर देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग म्हणून पुन्हा मुख्य प्रवाहात आणले जात आहेत, असे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांमुळे देशातील कारागीरांच्या कौशल्यात सुधारणा होईल आणि त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबई इथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी भारतातील वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक कला आणि हस्तकला जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जात असून त्याअंतर्गत आज विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान विश्वकर्मा योजना कारागिरांना भांडवली सहाय्य पुरवत आत्मनिर्भर भारतला चालना देईल यावर त्यांनी भर दिला.
छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड आणि महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्र्यांनी पात्र लाभार्थ्यांना बँकिंग प्रणालीच्या माध्यमातून 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कशा प्रकारे मिळेल हे स्पष्ट केले.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नाशिक इथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले की, या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 18 पारंपरिक व्यवसायांना सामावून घेण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेचा उद्देश देशातील पारंपारिक हस्तकलेच्या समृद्ध वारशाचा प्रचार आणि त्याचे जतन करणे हा आहे. यावेळी आमदार देवयानी फरांदे उपस्थित होत्या.
केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत पंतप्रधान विश्वकर्मा योजनेला केंद्राचे संपूर्ण पाठबळ लाभणार असून या साठीच्या 13,000 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्र सरकार अर्थसहाय्य पुरवणार आहे. पारंपारिक कौशल्यांचे जतन आणि संवर्धन करणे, कारागिरांना सक्षम करणे आणि भारताच्या समृद्ध वारसा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी योगदान देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेत कारागिरांना मोफत नोंदणी, प्रमाणपत्रे आणि ओळखपत्रांद्वारे मान्यता , कौशल्य प्रशिक्षण , टूलकिट सहाय्य , तारणमुक्त कर्ज , सवलतीचे व्याजदर आणि डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन आणि विपणन सहाय्य यासह विविध लाभ मिळणार आहेत. या योजनेद्वारे पारंपारिक कौशल्यांची गुरु-शिष्य परंपरा (शिक्षक-विद्यार्थी परंपरा) बळकट करणे, कारागीरांच्या उत्पादनांचा दर्जा सुधारणे आणि कारागिरांना देशांतर्गत आणि जागतिक मूल्य साखळीत सामावून घेणे अपेक्षित आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सहकार्याने महाराष्ट्रात पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या उदघाटन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.