अवयवदानाच्या जागृतीचे काम करणाऱ्या व्यक्तींची समाजाला गरज : डॉ. श्रीकांत केळकर
पुणे : अवयवदानाच्या जनजागृतीसाठी अरुण देवगांवकर यांचे कार्य महान आहे. अवयवदानाची गरज लक्षात घेऊन जनजागृतीचे कार्य करणाऱ्या व्यक्तींची आज समाजाला खूप गरज आहे, असे प्रतिपादन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आप्थॅलमॉलॉजीचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांनी केले.
अवयवदानासाठी सलग 34 वर्षे जनजागृती आणि प्रचाराचे मोलाचे काम करणाऱ्या अरुण देवगांवकर यांचा आडकर फौंडेशनतर्फे कोमल पवार स्मृती पुरस्कार देऊन आज (दि. 16) डॉ. केळकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोहिनूर सभागृहात आयोजित कार्यक्रमात फॅमिली फिजिशियन व आयएमएचे माजी राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, आडकर फौंडेशनेचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर यांची प्रमुख उपस्थित होती. सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. केळकर पुढे म्हणाले, रुग्णांची संख्या आणि अवयव दान करणाऱ्यांची संख्या लक्षात घेता अवयवदानासाठी जनजागृतीचे कार्य करणाऱ्यांची संख्या अजून वाढण्याची गरज आहे.
डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, अवयवदानाविषयी समाजात जागरुकता कमी आहे. जनमानसातील गैरसमजांमुळे अवयवदान केले जात नाही. अवयवदानाची चळवळ शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून रुजवली जाणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे अवयवदान करणाऱ्या तसेच रुग्णांच्या आरोग्याविषयीचे धोके कमी झाले आहेत. अवयवदान करणाची इच्छा असलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी अवयदानात आडकाठी आणू नये, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अवयवदानाच्या क्षेत्रात जनजागृतीचे कार्य करणाऱ्या व्यक्तींमार्फत हा पुरस्कार स्वीकारत असल्याची प्रांजळ भावना व्यक्त करून सत्काराला उत्तर देताना अरुण देवगांवकर म्हणाले, समाजात अवयवदानाविषयी सहवेदना-संवेदना जागृत होत आहे हे या पुरस्काराच्या निमित्ताने प्रतित होत आहे. समाजातील सर्व स्तरातून या पुण्यकर्मास सहकार्य लाभत आहे. भविष्यात अवयवदानाविषयीची जागृती वाढत जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
सुरुवातीस फौडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात पुरस्काराच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. सन्मानपत्राचे वाचन मैथिली आडकर यांनी तर मान्यवरांचे स्वागत ॲड. प्रमोद आडकर यांनी केले.
