क्रेडाई पुणे मेट्रोच्या दोन दिवसीय गृह खरेदी महोत्सवाला सुरुवात
पुणे: नजीकच्या भविष्यात घरखरेदी अथवा बांधकाम क्षेत्रात खरेदी करण्याची इच्छा असलेल्यांना आता एकाच छताखाली अनेकविध पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या क्रेडाई पुणे मेट्रोच्या दोन दिवसीय गृह खरेदी महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. वाकड येथील हॉटेल हॉटेल टीप टॉप या ठिकाणी युको बँकेचे पुणे विभागीय व्यवस्थापक जयदीप नंदी, बँक ऑफ बडोदाचे डेप्युटी जनरल मॅनेजर जयंत पाटजोशी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करीत महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन संपन्न झाले. क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, महोत्सव समितीचे अध्यक्ष जे पी श्रॉफ, समिती सदस्य मिलिंद तलाठी, क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष अरविंद जैन, विनोद चांदवाणी आणि महासंचालक डॉ डी के अभ्यंकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आज दि. १६ व उद्या दि १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायं ८ या वेळेत पुणे परिसरातील शुभारंभ लॉन्स- म्हात्रे पूल, हॉटेल वेस्टीन- कोरेगाव पार्क आणि हॉटेल टीप टॉप- वाकड या तीन ठिकाणी सदर महोत्सव सुरु असेल. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून या ठिकाणी भेट देणाऱ्या प्रत्येकाला लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्याची संधी देखील मिळणार आहे. बँक ऑफ बडोदा यांचे विशेष सहकार्य महोत्सवासाठी लाभले आहे.
दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या या महोत्सवादरम्यान शहरातील अनेकविध बांधकाम व्यावसायिकांचे सर्वोत्तम प्रकल्प, गृहयोजना, सदनिका, प्लॉट, बंगलो आणि व्यावसायिक प्रकल्प आदी नागरिकांना एकाच छताखाली पाहता येतील, शिवाय बांधकाम व्यवसायिकांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद देखील साधता येईल.
शहरातील सर्वोत्तम प्रकल्प आणि बांधकाम व्यवसायिकांचा सहभाग हेच याही वर्षीच्या महोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य असून यामध्ये सहभागी होणारे बांधकाम व्यावसायिक हे क्रेडाईचे सदस्य असल्याने या वेळी होणाऱ्या प्रत्येक व्यवहारात पूर्णत: पारदर्शकता असेल असेही जे पी श्रॉफ यांनी सांगितले आहे.