राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत विविध विषयांवरील प्रदर्शनी
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीचा प्रारंभ पुण्यात झाला असून बैठकस्थानी तीन विविध विषयांवरील प्रदर्शनी मांडण्यात आल्या आहेत. पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह देशभरातून बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी हे प्रदर्शन पाहिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्ष असून त्यानिमित्ताने शिवचरित्राची ओळख एका प्रदर्शनीद्वारे करून देण्यात आली आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळाही ठेवण्यात आला आहे. त्यांच्या एका हातात राजदंड तर दुसऱ्या हातात तलवार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग, इतिहासकार विजयराव देशमुख, वा. सी. बेंद्रे आदिंनी केलेले छत्रपती शिवरायांचे वर्णन, शिवकालीन पत्रांचे दाखले, कवी भूषण यांचे काव्य तसेच छत्रपती शिवरायांवरील पोवाडे, महाराजांनी उभारलेले आरमार, त्यांनी लिहिलेल्या पत्रांचे अनुवाद तसेच हिंदवी स्वराज्यातील गडकोट, ‘शिवभारता’तील काही वर्णने, छत्रपती शिवाजी महाराज यांचे ‘आज्ञापत्र’ अशी बहुमूल्य माहिती या प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा इतिहास जागविणारे ‘भक्ती शक्ती संगम’ हे शिल्पही या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे.
‘स्वातंत्र्य संग्रामातील जनजाती नायकांचे योगदान’ या विषयावरील प्रदर्शनी ‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम’ या संस्थेने तयार केली आहे. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या जनजाती समाजाने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यांचे बलिदान याची माहिती या प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे.
विविध संघटनांनी एकत्र येऊन प्रारंभ केलेल्या ‘स्वावलंबी भारत अभियान’ या विषयावरील प्रदर्शनी बैठकस्थानी मांडण्यात आली आहे. बेरोजगारी, गरिबी मुक्त आणि समृद्धी युक्त, स्वावलंबी भारताची निर्मिती हे या अभियानाचे लक्ष्य आहे. या अभियाना अंतर्गत आर्थिक, सामजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या ३० संस्थांचा सहभाग असून त्यांच्याकडून देशभर सुरू असलेल्या कार्याची माहिती या प्रदर्शनीद्वारे मांडण्यात आली आहे. यशस्वी नवउद्यमींच्या कथा या प्रदर्शनातून सांगण्यात आल्या आहेत.
