Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

अरविंद एज्युकेशन सोसायटीत दृष्टीहीन बसवराज उमराणी यांनी मनोरंजकपणे सांगितल्या गणितातील युक्त्या 

पिंपरी  : दृष्टिहीन असूनही नऊ अंकी संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराची गणिते तोंडीच सोडविण्याची क्लृप्ती पाहून विद्यार्थी व शिक्षकही अवाक् झाले. निमित्त होते जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल व भारतीय विद्यानिकेतनमधील माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित बसवराज उमराणी या युवकाच्या गणिती प्रत्यक्षिकांचे. 
           विद्यार्थ्यांच्या मनातील गणित या विषयाची भीती दूर करण्याच्या उद्देशाने संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव आणि चंद्रशेखर गनीगर यांच्या पुढाकाराने या अनोख्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणित शिक्षिका सोनाली आवळे, स्वाती तोडकर, हेमाली जगदाळे, लिटिल फ्लॉवर स्कूलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार उपस्थित आदी उपस्थित होते.
          अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात बसवराज उमराणी या युवकाने विद्यार्थ्यांच्या गणिती प्रश्नांना तोंडी उत्तरे दिली. नऊ अंकी संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराची गणिते तर त्यांनी तोंडीच चुटकीसरशी सोडविलीच ; शिवाय विद्यार्थ्यांच्या जन्मतारखांवरून आठवडे, वारही बिनचूक सांगितले. विद्यार्थ्यांना गणिते सोडवण्याच्या संकल्पना आणि सोप्या युक्त्या सांगीतल्या.
           मनोरंजक पद्धतीने एकप्रकारे त्यांनी आपल्या गणिती कौशल्याची चुणूक दाखवून दिली. बसवराज उमराणी हे दृष्टिहीन असूनही त्यांची गणिती क्रिया करण्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. शारीरिक अक्षमतेवर मात करून तोंडी गणित सोडवण्याची पद्धत त्यांनी आत्मसात केली आहे. म्हणूनच त्यांनी मानवी संगणक म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे. 
            गणित विषय सर्वांत जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे. गणित विषयाबद्दल शालेय विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची भीती असते. त्यामुळे गणित विषय त्यांना अवघड वाटू लागतो. शिक्षकांनी गणिते सोडविण्यासाठी विविध लहान-लहान युक्त्या विकसित करून गणित विषयाचे अध्यापन केले, तर विद्यार्थ्यांची गणित विषयात आवड निर्माण होईल, असे बसवराज उमराणी यांनी सांगितले.

Leave a Reply