संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नॉर्थ टेक सिम्पोसियम मध्ये केएसएसएलच्या ईसीएआरएसचे अनावरण
जम्मू : नॉर्थ टेक सिम्पोसियममध्ये देशाचे माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते अत्याधुनिक ४X४ मल्टीटेरेन अनमॅन्ड ग्राउंड व्हेईकल, एन्हान्स्ड कोलॅबोरेटीव्ह ऑटोनॉमस रोव्हर सिस्टिम (ईसीएआरएस)चे अनावरण केले. स्वायत्त लष्करी तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
एन्हान्स्ड कोलॅबोरेटीव्ह ऑटोनॉमस रोव्हर सिस्टिम (ईसीएआरएस) ला भारत फोर्जच्या पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्स लिमिटेडने विकसित केले असून, ते स्वायत्त लष्करी तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात आघाडीचे अभिनव तंत्रज्ञान आहे. पाळत ठेवणे, सुरक्षा आणि बचाव कार्यांसह अनेक वेगवेगळ्या मोहिमा पार पाडण्यासाठी डिझाइन केलेले, ईसीएआरएस लष्करी ऑपरेशन्समध्ये नव्या प्रकारचे अष्टपैलुत्व आणेल.
ईसीएआरएस हे टक्कर टाळण्याची प्रगत प्रणाली आणि आधुनिक मिशन नियोजन क्षमतांनी सुसज्ज आहे, त्यामुळे अनेक प्रकारच्या लष्करी परिस्थितींमध्ये ते एक विश्वासार्ह संसाधन ठरू शकते. याचा वेग प्रति तास १६ ते २० किमी दरम्यान असून, पेलोड क्षमता ३५० किलो व टोईंग पेलोड क्षमता ५०० केली आहे.

रिमोट कन्ट्रोल्ड वेपन स्टेशन्स (आरसीडब्ल्यूएस), वॉटर जेट मशिन्स यासारख्या वेगवेगळ्या प्रणाली तसेच सीमा व जलवाहिन्या ओलांडून अवजड सामग्रीची वाहतूक यासाठी ईसीएआरएस वापरले जाऊ शकते हे याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे सीमांवर पाळत ठेवणे, स्ट्रॅटेजिक ऍसेट पेरिमीटर सिक्युरिटी, दंगल नियंत्रण, सीबीआरएन (केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लियर) घटना, आग विझवणे, रसायन फवारणी आणि विविध पेलोड आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हे वापरले जाऊ शकते.
भारत फोर्ज लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांनी या उल्लेखनीय कामगिरीबाबत सांगितले की, “ईसीएआरएस हा लष्करी तंत्रज्ञानातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे एक अष्टपैलू, वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घेणारे मानवरहित, जमिनीवरचे वाहन आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या भूप्रदेशांमध्ये काम करण्याच्या क्षमता असून त्यामुळे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेत लक्षणीय वाढ होईल. ईसीएआरएसमध्ये प्रगत क्षमता असल्यामुळे ते पाळत ठेवण्यापासून सुरक्षेपर्यंतच्या विविध लष्करी ऑपरेशन्समध्ये वापरले जाऊ शकते. ईसीएआरएस संरक्षण तंत्रज्ञानाची क्षितिजे विस्तारण्याची केएसएसएलची वचनबद्धता दर्शवते.”
नॉर्थ टेक सिम्पोसियममध्ये माननीय संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते ईसीएआरएसचे अनावरण हा भारताच्या संरक्षण क्षमतांमध्ये नावीन्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाढ करण्याच्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी तांत्रिक उत्कृष्टतेच्या सीमा पार करण्याची भारत फोर्जची वचनबद्धता ईसीएआरएसमधून दिसून येते.
