‘बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे’ सीझन – 2 मोठ्या दिमाखात संपन्न
पुणे: दशकानुदशके कात टाकत आलेला मराठी सिनेमा, त्याचा इतिहास, त्यातील किस्से आणि पूर्वी कधीही न ऐकलेल्या मनोरंजक गोष्टींनी प्रेक्षकांना भुरळ घातली. आपल्या समृद्ध वारशाच्या या उत्सवात, देशातील आघाडीच्या रेडिओ नेटवर्कपैकी एक असलेल्या बिग एफएम ने आपल्या अत्यंत लोकप्रिय शो ‘बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे’ च्या सीझन 2 चा समारोप एका भव्य स्थळावर नेत्रदीपक कार्यक्रमासह केला. पुण्यात झालेल्या या कार्यक्रमाला मृणाल कुलकर्णी, वैभव तत्ववादी, सुव्रत जोशी, हृषिकेश जोशी, गायत्री दातार, आलोक राजवाडे आणि शोचे यजमान सुबोध भावे यांसारख्या मराठी उद्योगातील नामवंत मंडळींनी हजेरी लावली होती.
बिग मराठी बायोस्कोप च्या सीझन 2 मार्फत सुबोध भावेने श्रोत्यांना मराठी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित क्षण तसेच मराठी चित्रपटाला एक वेगळी ओळख देणाऱ्या अनेक दिग्गज कलाकारांचा रोमांचक प्रवास त्याच्या अनोख्या शैलीत कथन केला. यजमान सुबोध भावे यांनी केलेल्या या कार्यक्रमाने श्रोत्यांना मराठी चित्रपटांची जादू केवळ ऐकण्याचीच नाही तर पाहण्याचीही संधी दिली. याने प्रेक्षकांना उत्सव आणि जुन्या आठवणी यांचे अनोखे मिश्रण दिले आणि त्यांच्याशी एक अर्थपूर्ण संबंध निर्माण केला. मराठी उद्योगातील नायक आणि नायिकांना एकत्र आणत, मृणाल कुलकर्णी यांनी मराठी सिनेमाच्या गेल्या अनेक दशकांमधील बदलांबद्दल आकर्षक किस्से आणि त्यातील बारीक सारीक गोष्टी सांगितल्या. या झगमगत्या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली जेंव्हा विशेष पाहुणे सुव्रत जोशी, गायत्री दातार, वैभव तत्ववादी, हृषीकेश जोशी आणि आलोक राजवाडे मंचावर येऊन या उत्सवात सामील झाले. सुबोध भावेनेही त्याचे चाहते तसेच बिग एफ एमच्या इतर आरजे सोबत संवाद साधत त्याचा शो चा अनुभव सांगितला आणि शो ला मिळालेल्या प्रेमासाठी व उत्तम प्रतिसादासाठी प्रेक्षकांचे आभार मानले.
बिग एफएम चे सीओओ सुनील कुमारन याबद्दल बोलताना म्हणाले, “हृदयाला भिडणाऱ्या या शो ने बिग मराठी बायोस्कोपच्या सुबोध भावेसोबतच्या अतुलनीय प्रवासाचे प्रतिबिंब दाखवले आणि याला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आम्हाला आनंद झाला आहे. हा शो म्हणजे कालातीत कथा आणि अपवादात्मक प्रतिभेचा दाखला असणाऱ्या प्रसिद्ध मराठी चित्रपटसृष्टीला मनापासून अभिवादन आहे. ऑन-ग्राउंड कार्यक्रम हा एक समारंभ होता, ज्याने आमच्या श्रोत्यांना संपूर्ण अनुभवाचा सक्रियपणे भाग बनण्याची संधी दिली. अधिक ज्वलंत कथा आणि विलक्षण क्षणांचे अनुभव देण्याच्या वचनासह आम्ही पुढील अध्यायाची आतुरतेने वाट पाहत आहोत .”
अभिनेता आणि यजमानपद भूषविणारे , सुबोध भावे म्हणाले, “हा शो मराठी चित्रपट आणि नाटकाच्या अतुलनीय प्रवासाला आदरांजली ठरला आहे आणि आमच्या प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम आणि पाठिंबा पाहून मी खरोखरच स्वतःला भाग्यवान समजतो. आज या कार्यक्रमात आम्ही मराठी चित्रपटांच्या इतिहासातील महत्वाचे क्षण साजरे केले, उद्योग जगतात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींची उपस्थिती लाभली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या श्रोत्यांशी एक मजबूत नाते निर्माण केले. या ऑन-ग्राउंड कार्यक्रमासह सीझन 2 चा उच्चांक गाठत, मराठी सिनेमाची जादू साजरी करणारा आगळावेगळा रेडिओ शो तयार केल्याबद्दल मी बिग एफएमचे आभार मानू इच्छितो.”
