नवीन शैक्षणीक धोरण देशाच्या प्रगतीसाठी उभारी देणारे ठरले – चंद्रकांत पाटील
पुणे : जग प्रगतीपथावर असताना भारतही सशक्त होवून जगाच्या प्रगतीत आपली भूमिका पार पाडत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले. देशाच्या प्रगतीसाठी हे नवीन शैक्षणीक धोरण उभारी देणारे ठरले. ज्यामुळे विद्यार्थी आता अधिक उद्योगभिमूख होवून, उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी सज्ज होत आहेत, असे मत पुण्याचे पालकमंत्री व उच्च व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट या मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेतर्फे एशिया पॅसिफिक फेडरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या संयुक्त विद्यमाने ‘नॅटकॉन २०२३’ या ३९ व्या दोन दिवसीय राष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यांचा समारोप आज हॉटेल जे. डब्ल्यू मॅरिएट येथे करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, ‘नॅटकॉन २०२३’ या राष्ट्रीय परिषदेचे निमंत्रक डाॅ. संतोष भावे, एनआयपीएम, पुणे चॅप्टरचे चेअरमन कल्याण पवार, एनआयपीएम- ‘नॅटकॉन २०२३’ च्या आयोजन समितीचे अध्यक्ष सदाशिव पाटील आणि एनआयपीएमचे महासचिव एम.एच. राजा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी या परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच एन आय पी एम केरळ, कर्नाटक आणि औरंगाबाद चाप्टरला उत्कृष्ठ कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, संपूर्ण जग प्रगती करत असताना आपला देश अधिक सशक्त होवून इतर देशांना मदत करत आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले.यामुळे देशाच्या प्रगतीला अधिक उभारी मिळाली. जी गरजेची ही होती. मनुष्यबळ विकास केंद्रात एन आय पी एम देश पातळीवर मोठे काम करत आहे. मी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री झाल्यावर उद्योगाच्या अनुषंगाने कोर्सेस डिजाईन केले गेले. प्रात्यक्षिक काम करण्यावर जास्त भर देण्यात आला. आगामी काळात उद्योग व्यावसायात कोणत्या मनुष्य बळाची गरज आहे. ते समजून घेवून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याची विद्यापीठांची जबाबदारी आहे. तर त्यांना कुशल कामागारांबरोबरच चांगला नागरिक बनवण्याची जबाबदारी आता उद्योग, व्यावसायाची आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे नाव आहे. आम्ही energy sustainability, energy devices and development आणि energy resources क्षेत्रावर जास्त फोकस करतो. नवीन शैक्षणिक धोरणामुळे आम्ही विद्यार्थ्यांना अधिक उद्योगभिमुख बनवण्यासाठी आणि स्पर्धेत उतरण्यासाठी मदत होत आहे. आगामी काळ हा चिप टेक्नॉलॉजी, बायो टेक्नॉलॉजी आणि हायड्रोजन टेक्नॉलॉजीचा येणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठात हे तंत्रज्ञान विकसीत करण्याचे काम सुरू असल्याचेही गोसावी यांनी सांगितले.