fbpx
Tuesday, September 26, 2023
Latest NewsMAHARASHTRAPUNE

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये होणार सर्वांत मोठे मराठी जनांचे संमेलन

पुणे  : मराठी संस्कृतीचा, भाषेचा आणि मराठी जनांचा झेंडा अमेरिकेत फडकविणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने ‘बीएमएम २०२४’ या देशाबाहेरील सर्वांत मोठ्या मराठी जनांच्या द्विवार्षिक संमेलनाचे आयोजन २७ ते ३० जून, २०२४ दरम्यान अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन होजे येथे करण्यात येणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या संमेलनात मराठी कला, संस्कृती, परंपरा आणि खाद्यसंस्कृतीचा उत्सव साजरा करण्याबरोबरच व्यापारी परिषद, ज्येष्ठ नागरिकांसंबंधी असलेले विशेष कार्यक्रम, विवाह करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींचा मेळावा, प्रथमच होणारा लघुपट महोत्सव अशा अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अमेरिकेच्या बे एरिया (सिलिकॉन व्हॅली) मधील सुप्रसिद्ध उद्योजक व या संमेलनाचे निमंत्रक प्रकाश भालेराव यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. बीएमएमचे प्रतिनिधी दिमाख सहस्रबुद्धे, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस् महासंघ मर्यादितचे सुहास पटवर्धन हे देखील यावेळी उपस्थित होते.

संमेलनाविषयी माहिती देताना प्रकाश भालेराव म्हणाले, “नोकरी, व्यवसाय, शिक्षण आदी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींमुळे मोठ्या प्रमाणात मराठी माणूस अमेरिकेत वास्त्यव्यास आहे. अमेरिकेतील मराठी माणसाला एकत्र आणत मराठी संस्कृती जपणे व एकमेकांना मदत होईल, असे काही उपक्रम राबविण्यात अमेरिकेत १९८१ साली स्थापन झालेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाचा (बीएमएम) सिंहाचा वाटा आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील बे एरियामध्ये २५ वर्षांपूर्वी १ हजार मराठी कुटुंबांचे वास्तव्य होते. आज ही संख्या १० हजार मराठी कुटुंबांपर्यंत गेली आहे. मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची संख्या यामध्ये सर्वाधिक अर्थात सुमारे ८० टक्के इतकी आहे. प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, स्टार्टअप्स क्षेत्रात कार्यरत असलेले हे मराठी नागरिक उच्च शिक्षित आहेत. देशाबाहेर सर्वाधिक मराठी नागरिकांचे वास्तव्य असलेला असा हा जगातील एकमेव प्रदेश आहे.”

बृहन्महाराष्ट्र मंडळ हे आज उत्तर अमेरिकेतील ५४ मंडळांचे प्रतिनिधित्व करते. या मंडळांच्या माध्यमातून अमेरिकेत असलेल्या मराठी जनांसोबतच नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची, कलेची, परंपरांची आणि खाद्यसंस्कृतीची माहिती व्हावी, यासाठी अनेकविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांमध्ये सर्वात महत्वाचा व मोठा उपक्रम म्हणजे बीएमएमचे द्विवार्षिक संमेलन हा होय. १९८३ पासून या संमेलनाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. यावर्षी बे एरियामध्ये होणारे हे संमेलन अमेरिकेतील आजवरचे सर्वांत मोठे संमेलन ठरणार असून यामध्ये अमेरिकेत स्थायिक असलेले तब्बल ७००० मराठी नागरिक सहभागी होतील असा विश्वास भालेराव यांनी व्यक्त केला.

भालेराव पुढे म्हणाले की, संमेलनादरम्यान सॅन होजे येथील भव्य अशा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. व्यापारी परिषदेने २७ जून पासून संमेलनाला सुरुवात होणार होईल. या अंतर्गत नोकरी व व्यवसायाच्या संधी, स्टार्टअपला पुढे नेण्यासाठीचे गरजेचे आणि आर्थिक सहाय्य मिळवण्याविषयीचे मार्गदर्शन आदी विषयांवर विचार मंथन होईल. अमेरिकेत स्थायिक झालेली तरुण पिढी आणि येथेच जन्माला आलेली तरुण पिढी यांसमोर असलेली विविध आव्हाने लक्षात घेत या दोन्ही प्रकारच्या तरुण विद्यार्थ्यांसाठी, नव उद्योजकांसाठी संमेलनात अनेक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिकेत स्थायिक झालेल्या तरुणाईसाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासंदर्भातील विशेष चर्चासत्राचा यामध्ये समावेश आहे.

याच दिवशी खास ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘उत्तररंग’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, अमेरिकेतील वास्तव्य तसेच इतर अनेक संबंधित विषयांवर चर्चा व मार्गदर्शनपर कार्यक्रमांचा सहभाग असेल. डॉक्टर व इंजिनीअर यांपलीकडे जात करिअरच्या वेगळ्या वाटा निवडीत यशस्वी झालेले मराठी जन हे संमेलनात उपस्थित असणारी तरुण पिढी व त्यांच्या पालकांशी ‘बियाँड डॉक्टर्स अँड इंजिनीअर्स’ या विषयावर संवाद साधतील. लग्नाळू मुला मुलींसाठी असलेला ‘रेशीमगाठी’ हा उपक्रम, प्रायोजक व निमंत्रितांसाठी असलेला भव्य स्वागत समारंभ व सर्वांसाठी असलेला ‘संगीत रजनी’ या कार्यक्रमांच्या आयोजनाने पहिल्या दिवसाची सांगता होईल.

दुसऱ्या दिवशी संमेलनाचे औपचारिक उद्घाटन व मुख्य सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होईल. यानंतर संमेलनस्थळी धार्मिक, आध्यात्मिक, संगीत, कला विषयातील तज्ज्ञ मंडळींची व्याख्याने, काही कार्यशाळा, मराठी मंडळांच्या एकांकिका स्पर्धा यांचे आयोजन असेल. सर्व उपस्थितांसाठी असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप होईल. संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी मुख्य भाषणे, बीजभाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतील.

महोत्सवाच्या चौथ्या दिवशी संमेलनाचा समारोप होईल. यानंतर बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या व्यवस्थापन समितीची निवडणूक होईल. मंडळाच्या वतीने यानंतर एका विशेष समारंभात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मराठी जनांचा सन्मान व सत्कार करण्यात येईल. यंदा प्रथमच बीएमएम संमेलनात एका चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत एका मराठी चित्रपटाचे प्रिमियर व त्यानंतर निवड समितीने निवडलेल्या काही विशेष लघुपटांचे प्रदर्शन होईल. तसेच यावेळी चित्रपट विषयक कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भालेराव यांनी दिली.

“संमेलनादरम्यान अमेरिकेत असलेल्या आणि बीएमएमसारख्या संस्थांशी संबधित असलेल्या सामाजिक संस्थांचे काम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने या संस्थांना आपली माहिती देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि आपल्या सेवांसंदर्भात उपस्थितांशी संवाद साधण्याकरीता बूथ देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत,” असे प्रकाश भालेराव यांनी स्पष्ट केले.

बीएमएम २०२४ संमेलनाची पूर्व तयारी सुरु झाली असून आज ३५० स्वयंसेवक २० विविध समित्यांच्या माध्यमातून काम करीत आहेत. येत्या काही महिन्यात तयारीला वेग आल्यानंतर तब्बल ७०० स्वयंसेवक संमेलनासाठी कार्यरत असतील. संमेलनादरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांसाठी बे एरियामध्ये असलेले कलाकार तर सहभागी असतीलच शिवाय भारतातून २०० हून अधिक कलाकार देखील सहभागी होणार आहे. संमेलन कालावधीत सॅन होजे कन्व्हेन्शन सेंटर जवळपास असलेल्या तब्बल २५०० हॉटेल रूम्स मंडळाच्या वतीने राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

या भव्य संमलेनाच्या माध्यमातून संकलित झालेल्या निधीचा काही भाग हा अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय व मराठी ज्येष्ठ नागरिक यांच्या काही महत्वाच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात येणाऱ्या काही उपक्रमांसाठी वापरला जाणार आहे. यात प्रामुख्याने आजारी ज्येष्ठ नागरिकांना व त्यांच्या नातेवाईकांना गरज असताना जेवणाचे डबे पुरविणे, मृत्यूपश्यात हिंदू धर्माप्रमाणे अंत्यसंस्काराची व्यवस्था कण्यासाठी मदत करणे आदी उपक्रमांचा समावेश आहे, असेही भालेराव यांनी स्पष्ट केले.

या वर्षीच्या संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेतील सर्व मराठी जनांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्यासाठी या संमेलनापासून एका विशेष अॅपची निर्मिती करण्यात आली असून अनेकविध सेवा याद्वारे उपलब्ध करून दिल्या जातील.

Leave a Reply

%d bloggers like this: