आनंदरूप संगीताच्या माध्यमातून पं. तोरवी यांची ईश्वरसेवा; स्वामी श्रीकांतानंद यांचे गौरवोद्गार
पुणे : आनंद हे परमेश्वराचे स्वरूप आहे आणि आनंदमय असणारे संगीत हे ईश्वरप्राप्तीचे एक माध्यम आहे. अशा आनंदरूप संगीतकलेच्या माध्यमातून पं. विनायक तोरवी ईश्वरसेवा करत आहेत, असे गौरवोद्गार रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी श्रीकांतानंद यांनी काढले आणि पं. विनायक तोरवी यांना शुभाशीर्वाद दिले.
बंगळूरूस्थित गुरुराव देशपांडे संगीत सभा व पुण्यातील अल्फा इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने व किशोर पंप्स यांच्या सहकार्याने पंडित विनायक तोरवी अमृत महोत्सवी वर्षाला रविवारपासून सुरुवात झाली. सदर अमृत महोत्सवाअंतर्गत वर्षभर देशातील विविध शहरांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यातील पहिला कार्यक्रम नुकताच पुण्यात संपन्न झाला. कार्यक्रमात पंडित विनायक तोरवी यांचा स्वामी श्रीकांतानंदजी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
आयोजक निखिल जोशी, अपर्णा पणशीकर- जोशी, प्रसिद्ध संवादिनी वादक सुयोग कुंडलकर, पं विनायक तोरवी यांच्या शिष्या श्रुती भट आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रसिद्ध कलाकार सुयोग कुंडलकर म्हणाले, “बुलंद आवाजातला गोडवा, हे पं. तोरवी यांच्या गायनाचे वेगळेपण आहे. ग्वाल्हेर घराण्याच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाला त्यांनी किराणा घराण्याच्या गायकीची सुरेल जोड दिली आहे. मधुकर वृत्तीने विविध गानशैली त्यांनी आपल्या गायकीत सामावून घेतल्या आहेत. रंगदेवता प्रसन्न असणारे कलाकार, असे त्यांचे वर्णन करता येईल.”
श्रुती भट म्हणाल्या, “संगीत शिकवण्यापेक्षा संगीत जगावे कसे, हे गुरुजींनी सांगितले. संगीत हे तंत्र नाही, ते तत्त्व आहे, हे त्यांनी शिकवले. संगीत हा सर्जनशील असा संवाद आहे, जो ऐकणाऱ्याला विचारप्रवृत्त करतो आणि अंतर्दृष्टी उघडतो, असे ते म्हणतात आणि ते संगीत जगतात.”
पं. विनायक तोरवी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सुरुवातीची मैफल गायिका कस्तुरी दातार अत्रवलकर यांनी सादर केलेल्या राग बिलासखानी तोडी आणि अल्हैयाबिलावलमधील रचनांनी रंगतदार झाली. कस्तुरी दातार यांनी दमदार व सुरेल गायकीचे दर्शन घडवले. त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या ‘आता कोठे धावे मन’ या अभंगाने सांगता केली. उत्तरार्धात पं. योगेश समसी यांच्या नजाकतदार तबलावादनाने रसिकांची दाद मिळवली. पंजाब घराण्याच्या वादनाची सारी वैशिष्ट्ये पं. योगेश यांनी घुमारदार आणि ताकदीच्या वादनाने उलगडत नेली. त्यांना मिलिंद कुलकर्णी यांनी लेहरा साथ केली.
आयोजक निखिल जोशी यांनी भारतीय अभिजात कलांना पाठिंबा देण्यासाठी अल्फा इव्हेंटची स्थापना केल्याची माहिती दिली. नीरजा आपटे यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रेय वेलणकर यांनी आभार मानले.
