fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsPUNE

इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव थाटात साजरा

पुणे : राधे कृष्ण गोपाल कृष्ण… च्या जयघोषात आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन) पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता येथील मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वृंदावनातील बरसाना, नंदगाव, गोविंदकुंड, राधाकुंड अशा वेगवेगळ्या ठिकाणांचे देखावे अनुभविण्यासोबतच सुंदर अशा पाळण्यामध्ये राधाकृष्ण विराजमान झालेले असताना प्रत्येक भक्ताने राधाकृष्ण यांना पाळणा देत जन्माष्टमी उत्सव थाटात साजरा केला.

मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले, संपर्क प्रमुख जनार्दन चितोडे, उत्सव समन्वयक अनंतगोप प्रभू, प्रसाद कारखानीस, भक्ती भोसले यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. मंदिराचे उपाध्यक्ष रेवतीपती प्रभू, जयदेव प्रभू यांनी अभिषेकाची आणि उत्सवाची व्यवस्था पाहिली. जन्माष्टमी निमित्त पहाटे ४.३० वाजता मंगल आरतीने प्रारंभ झाला. सुमारे १२०० परिवारांनी भगवंतांना अभिषेक केला. अभिषेकासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्तांना पवित्र धागा घालून चंदन, अत्तर लावून त्यांना अभिषेकाच्या ठिकाणी पाठवण्यात येत होते. अभिषेकानंतर प्रत्येक परिवाराला चरणामृत देण्यात येत होते.

जन्माष्टमीनिमित्ताने यंदा २.५ ते ३ लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. भगवान श्रीकॄष्णाला अभिषेक करुन, २५० पेक्षा जास्त पक्वानांचा नैवेद्य दाखवण्यात आला. या अभिषेकामध्ये दूध, दही, तूप, मध, फळांचा रस इत्यादी सुमारे १०० वेगवेगळ्या द्रव्यांचा समावेश केला जातो. त्यानंतर रात्री १२ वाजता आरती देखील झालीमंदिरात २४ तास कीर्तन-भजन चालू होते. अनेक प्रकारच्या धार्मिक आणि पूजेच्या वस्तूंचे सुद्धा प्रदर्शन तसेच, इस्कॉनच्या विविध उपक्रमांचे आणि वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते.

उत्सवाच्या निमित्ताने मंदिराच्या स्वागत कक्षामध्ये सुंदर अशी राधाकृष्ण, गोवर्धन धारी राधा कृष्णाची रांगोळी काढलेली होती. तसेच येणाऱ्या भाविकांसाठी पूजेच्या थाळीची व्यवस्था केली आहे. मंदिरामध्ये राधा वृंदावन चंद्र जगन्नाथ बलदेव सुभद्रा आणि चैतन्य महाप्रभू नित्यानंद… असे तीन देव्हारे आहेत. राधाकृष्ण यांना अत्यंत सुंदर असे वस्त्र परिधान करण्यात आले होते. तसेच वेगवेगळ्या दागिन्यांमुळे राधा कृष्णाचे रूप अधिक मोहक दिसत होते. तसेच मंदिरातील तिन्ही देव्हा-यांना सोनेरी झळाली देण्यात आली आहे त्यामुळे भगवंताचे हे रूप अधिक मनोहारी दिसत होते

इस्कॉन मंदिराच्या प्रांगणातच बालाजी यांचे अत्यंत सुंदर असे मंदिर आहे. हे मंदिर दाक्षिणात्य शैलीने बनवले आहे. येथील संपूर्ण उत्सव बालाजींच्या परंपरागत पद्धतीने साजरे केले जातात. आज सुंदर असे वस्त्र व आभूषणांनी सजवल्यानंतर त्यांचे रूप अत्यंत मोहक दिसत होते. तसेच मंदिरात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवात देशभरातून ८०० कलाकारांनी सहभाग घेत शास्त्रीय संगीत, भजन, कीर्तन, गायन, नृत्य, नाटिका असे कार्यक्रम सादर केले.

Leave a Reply

%d bloggers like this: