Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शरद पवारांनी बोलावली आमदार, खासदारांची बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर  शरद पवार आता पक्ष बांधणीवर भर देत आहेत. शरद पवार यांनी राज्यातअनेक सभा घेण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार मोर्चेबांधणी करत आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी मजबूत करण्यावरही ते भर देत आहेत. आता शरद पवार यांनी मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली असून सर्व आमदार आणि खासदारांना उपस्थित राहण्यासाटी सूचना करण्यात आल्या आहेत. 

शरद पवार यांनी येत्या ९ सप्टेंबर रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. वाय. बी. चव्हाण सेंटर येथे ही बैठक होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार ज्या ज्या ठिकाणी सभा घेतात त्या ठिकाणी अजितदादा गटाकडून उत्तर सभा घेतली जात आहे. शरद पवार यांनी घेतलेल्या सभेच्या ठिकाणी दुप्पट शक्तीप्रदर्शन करून शरद पवारांना शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

इंडिया आघाडीने शरद पवार यांना समन्वय समितीत घेतले आहेत. त्यामुळे पवारांवर मोठी जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. शरद पवार कामाचे वाटप करून देश पातळीवर लक्ष घालण्याची शक्यताही आहे. शिवाय राज्यातही जास्तीत जास्त सभा घेण्याचं नियोजन केलं जाणार असल्याची शक्यता आहे.

शरद पवार या बैठकीत आमदार आणि खासदारांच्या कामकाजांचा आणि त्यांच्या मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. माजी आमदार आणि माजी खासदारांच्या मतदारसंघांचाही आढावा घेणार आहेत. तसेच लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीच्या सर्व विद्यमान आमदार आणि खासदारांना बोलावण्यात आले आहे. याशिवाय माजी आमदार, माजी खासदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनाही बैठकीचे निमंत्रण देण्यात आाले आहे. स्वत: शरद पवार या बैठकीला संबोधित करणार आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading