रिमझिम सरींमध्ये दृष्टीहीन मुलींनी लुटला वर्षा सहलीचा आनंद
पुणे : रिमझिम पडणारा पाऊस अंगावर झेलत आणि आपल्या सभोवतालचा निसर्ग केवळ स्पर्शाने अनुभवित दृष्टीहीन मुलींनी आपल्या मैत्रिणींसोबत रिमझिम सरीत वर्षा सहलीचा आनंद लुटला. सृष्टीचे निसर्गसौंदर्य डोळ्यांनी पाहता येत नसले, तरी त्यांनी पावसाच्या सरींनी चिंब होत निसर्गसौंदर्याची उधळण प्रत्यक्ष अनुभविली. तसेच, कांदा भजी, पिठलं-भाकरी, साजूक तुपातला शिरा या गावरान मेनूवर देखील विद्यार्थिनींनी ताव मारला.
निमित्त होते, शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळातर्फे दृष्टीहीन विद्यार्थीनींसाठी आयोजित वर्षासहलीचे. कोथरूड येथील पुणे अंध मुलींची शाळा, वाघोली येथील लुई ब्रेल अंध अपंग कल्याणकारी संस्था, न-हे येथील साई गुरु सेवा संस्था या संस्थांमधील दीडशे मुलींनी या वर्षात सहलीत सहभाग घेतला. वर्षा सहलीचा आनंद घेण्यासोबतच केतकावळे बालाजी मंदिर व नारायणपूर दत्त मंदिर येथे दर्शन घेतले. यावेळी राजाभाऊ कदम, अॅड. सुभाष मोहिते, विनायक घाटे, पियुष शहा, कुमार रेणुसे, किरण सोनीवाल, दिलीप मोहिते, मनीषा निंबाळकर, सागर पवार, सागर घम आदी यावेळी उपस्थित होते.
सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश सांगळे, अमर लांडे, विक्रांत मोहिते, अमेय थोपटे, सुरेश तरलगट्टी, अॅड. हेमंत झंजाड यांनी संयोजन केले. यावेळी मुख्याध्यापक दामोदर सरगम, सहप्रशासक देविका पवार, विशेष शिक्षिका वैशाली लहरे, विशेष शिक्षक प्रशांत शिंदे, या व्यतिरिक्त इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग देखील उपस्थित होता. अनिल राजगुरू व बाळासाहेब राजगुरू यांच्या कापूरहोळ येथील फार्म हाऊस वर उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
गणेश सांगळे म्हणाले, पावसाळा आला की सर्वांनाच वर्षा सहलीचे वेध लागतात. पावसाळ््याचा आनंद दृष्टीहीन मुलींनाही घेता यावा, याकरीता वर्षासहलीचे आयोजन केले जाते. वर्षासहलीचा मनसोक्त आनंद विद्यार्थीनी घेतात, त्यामुळे दरवर्षी या सहलीला येण्यास त्या उत्सुक असतात. या दृष्टीहीन मुलींना आनंद देण्यातच कार्यकर्त्यांना आनंद व उर्जा मिळत असते. यंदा देखील ताई-दादांसोबत गप्पा मारत बसमध्ये बसून गाण्यांच्या भेंडयांमध्ये देखील विद्यार्थीनींनी उत्साहाने सहभाग घेतला. तर दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा सहलीला न्याल ना? असा गोड हट्टही मंडळातील ताई-दादांकडे केला.
