Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRA

‘बाबासाहेबांची पीपल्स घेणार पुन्हा भरारी’ संस्था वाचविण्यासाठी एकवटला सर्व समाज

औरंगाबाद : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त मंडळाच्या वादामुळे लयास जाण्याची भीती असणारी पीईएस संस्था वाचविण्यासाठी संस्थेच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून आता समाज एकवटत असल्याने पीपल्स एज्युकेशन सोसायटी पुन्हा भरारी घेईल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

मिलिंद मल्टिपर्पज हायस्कुल येथे मागील काही दिवसात संस्थेचे आजी माजी विद्यार्थी व संस्थेचे हितचिंतक यांच्या अनेक बैठका पार पडल्या त्यातून पीईएस बचाव मोर्चा काढून संस्थेच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचे निश्चित करण्यात आले त्यानुसार दि.१३ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता मिलिंद महाविद्यालय तेमिळकॉर्नर मार्गे टाऊन हॉल उड्डाणपूल ते किलेअर्क मार्गे विभागीय आयुक्त कार्यालय असा पीईएस बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे.

धर्मादाय आयुक्त कार्यालय,मुबंई येथे 2002 पासून संस्थेच्या विश्वस्त मंडळाचा वाद सुरू असून हा वाद सतत पेटत रहावा या साठी सत्तेतील विविध पक्षांनी प्रयत्न केले. आता तर थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या-भाजपच्या हस्तकांनी ही संस्था गिळंकृत करण्याचा डाव आखल्याने ही संस्था वाचविण्यासाठी आजी माजी विद्यार्थी व संस्थेच्या हितचिंतकांनी एकत्र येत या विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुकले आहे.

पीपल्स एज्युकेशन सोसायटी वाचविणे,तिच्या विकासात हात भार लावणे हे आपले कर्तव्य असून पीईएस च्या शाळा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात अभियान राबविण्याचे ठरविण्यात आले.

दि.१३ सप्टेंबर रोजीच्या मोर्चाची पूर्वतयारी म्हणून शहरात ठिकठिकाणी स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार असून, उद्या पासून ठिकठिकाणी कॉर्नर बैठका घेऊन मोर्चात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. कॉर्नर बैठकांच्या द्वारे देखील स्वाक्षरी गोळा करण्यात येणार असून रविवार दि.१० सप्टेंबर रोजी मिलिंद महाविद्यालय येथून ५०० दुचाकी वाहनांची रॅली काढून शहरभर जनजागृती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
पीईएस बचाव बाईक रॅली मिलिंद महाविद्यालय, मिलकॉर्नर,भडकलगेट, टाऊन हॉल,किलेअर्क,हडको कॉर्नर,सिद्धार्थ नगर,टिव्ही सेंटर,जळगाव रोड,आंबेडकर नगर,सिडको बसस्टँड,रमानगर,उस्मानपुरा,क्रांतीनगर भागातून जाणार आहे.

मोर्चाच्या माध्यमातून एस पी गायकवाड सारख्या असक्षम व्यक्तीने स्वतःहून संस्थेचा राजीनामा द्यावा, जे लोक संस्थेच्या विकासाबाबत गंभीर नाहीत अश्यांनी संस्थेच्या विश्वस्त पदावर केलेले दावे मागे घ्यावेत व संस्था वाद मुक्त करावी, संस्थेच्या नागसेनवन परिसरातील अतिक्रमण हटवावे ,अनेक वर्षांपासून प्रलंबित खटल्यांचा निकाल लावावा, विविध महाविद्यालयात एस पी गायकवाड यांनी केलेल्या आर्थिक भ्रष्टाचार, चुकीच्या पद्धतीने केलेल्या नियुक्त्या यांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, मिलकॉर्नर ते मिलिंद चौक,मिलींद चौक ते विद्यापीठ गेट तसेच पाणचक्की येथील रस्ते संस्थेच्या जागेतून गेले असताना अद्यापही त्याचा मोबदला संस्थेला मिळाला नसल्याने तो देण्यात यावा अश्या मागण्या करण्यात येणार आहेत.
निवेदनासोबत नागरिकांच्या सुमारे 40,000 स्वाक्षऱ्या जोडण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading