Cricket World Cup साठी टीम इंडिया जाहिर
नवी दिल्ली : आजपासून एक महिन्यानंतर भारतात सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्यासाठी आयसीसीने दिलेल्या मुदतीचा आज (५ सप्टेंबर) शेवटचा दिवस होता. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत भारतीय शिलेदारांची नावे जाहीर केली आहेत. विश्वचषकासाठी भारतीय संघाचे कॉम्बिनेशन चांगले दिसत आहे. संघामध्ये पाच फलंदाज आहेत. दोन विकेटकिपर आहेत. ४ अष्टपैलू खेळाडू आणि चार गोलंदाजासह भारतीय संघ विश्वचषकात उतरणार आहे.
रोहित शर्मा १५ सदस्यीय भारतीय संघाचा कर्णधार असेल तर हार्दिक पांड्या उपकर्णधार असेल. भारतीय संघ फक्त एकच प्रमुख फिरकी गोलंदाजासह विश्वचषकात उतरणार आहे. कुलदीप यादव याच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी असेल. तर इशान किशन आणि केएल राहुल विकिकेटकिपर म्हणून भूमिका बजावतील. ५ ऑक्टोबर रोजी विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे. सूर्यकुमार यादव याला संधी देण्यात आली आहे.
दुसरीकडे विश्वचषकाच्या अंतिम १५ खेळाडूमध्ये संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांना संधी मिळाली नाही. त्याशिवाय प्रसिद्ध कृष्णा यालाही स्थान मिळवण्यात यश आले नाही. भारताच्या १५ जणांच्या चमूमध्ये एकही ऑफ स्पिनर गोलंदाजाला स्थान दिले नाही.
केएल राहुल याची विश्वचषकासाठी निवड झाली आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी केएल राहुल याच्या फिटनेसबाबतही अपडेट दिली आहे. केएल राहुल याने एनसीएमध्ये फिटनेसवर काम केले असून त्याने फिटनेस टेस्ट पास केली आहे. तो खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे, असे अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर श्रीलंकेत पोहोचले असून त्यांनी तेथे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या नावांना मान्यता दिली आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल(विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव
𝗪𝗘 𝗔𝗥𝗘 𝗧𝗘𝗔𝗠 𝗜𝗡𝗗𝗜𝗔! 🇮🇳 👏#CWC23 | #TeamIndia pic.twitter.com/Forro8kCYL
— BCCI (@BCCI) September 5, 2023
