Sunday, July 26, 2026
Latest NewsPUNE

रॉय किणीकर कवितेच्या अलौकिक पातळीवरील क्षण उत्कटतेने जगले : दयानंद घोटकर


पुणे : नाट्यलेखक आणि कवी असे बहुमुखी प्रतिभावंत असणारे रॉय किणीकर आयुष्यभर साहित्य क्षेत्रात चौकटीबाहेर फकीर वृत्तीने जगले. त्यांच्या साहित्यामध्ये जीवनविषयक तत्त्वज्ञान दिसते पण त्यामध्ये पांडित्याचे ओझे नाहीये. त्यांना कला आणि व्यवहाराची सांगड घालणे जरी जमले नसले तरी ते कवितेच्या अलौकिक पातळवरील प्रत्येक क्षण उत्कटतेने जगले आहेत, असे प्रतिपादन गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी केले.

रॉय किणीकर यांच्या ‌‘घरटे शोधणारे पिस’ या कार्यक्रमाचे 101 प्रयोग केल्याप्रित्यर्थ प्रसिद्ध गायिका, संगीतकार धनश्री गणात्रा यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी घोटकर यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. रॉय किणीकर यांच्या स्मृती दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष मैथिली आडकर व्यासपीठावर, प्रज्ञा महाजन होते. सन्मानपत्र, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
गायक, संगीतकार धनश्री गणात्रा यांनी अभिरुचीसंपन्न कार्यक्रमाची निर्मिती केली असल्याचे घोटकर म्हणाले. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या रंगत-संगत प्रतिष्ठानचे त्यांनी कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना धनश्री गणात्रा म्हणाल्या, रॉय किणीकर प्रत्येकाला कळतीलच असे नाही. त्यांच्या एका रुबाईचा ग्रंथ होईल अशी ताकद त्यांच्या शब्दात आहे. ज्या-त्या भाषेतील साहित्य हे त्या-त्या समाजाचा आरसा असतो असे आपण म्हणतो. त्यांच्या साहित्यातून कवींना प्रेरणा मिळावी यासाठी कार्यक्रम करीत असल्याचे त्या म्हणाल्या.
सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. उपस्थितांचा सत्कार ॲड. प्रमोद आडकर आणि मैथिली आडकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यात प्रभा सोनवणे, धनंजय तडवळकर, केतकी देशपांडे, मिलिंद शेंडे, निलाक्षी महाडिक, निरूपमा महाजन, ऋचा घाणेकर, रुपाली अवचरे, शैलजा किंकर, स्वाती सामक, सुजाता पवार, सुजित कदम, तनुजा चव्हाण, वैजयंती आपटे, वासंती वैद्य, विजय सातपुते, राजश्री लेले यांचा सहभाग होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading