मराठा आरक्षण : नुसत्या बैठका नको; अध्यादेश काढा – मनोज जरांगे आक्रमक
जालना : जालण्यातील मराठा आरक्षण विषयक आंदोलना विषयी सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र यावेळी राज्य सरकारने आंदोलकांच्या मागणी विषयी कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने जोवर अध्यादेश येत नाही तोवर उपोषण सुरूच ठेवणार, असल्याचा आक्रमक पवित्रा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी घेतला आहे.
जालन्यात मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळी मराठा आरक्षण आंदोलकांवर 1 सप्टेंबरला पोलिसांकडून लाठीमार झाला. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी रासतारोको, बंद व जाळपोळ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणा संदर्भात उच्चस्तरीय बैठक आज घेण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी उपस्थित होते. याविषयी माहिती सरकारच्या वतीने आज माहिती देण्यात आली. मात्र, जरांगे यांची मागणी स्पष्टपणे मान्य न करता मराठा समाजाविषयी महायुतीच्या काळात घेतले गेलेल्या निर्णयांचा पाढा वाचला.
याविषयी जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केलेल्या सर्व बाबी प्रक्रियेत आहे. या सर्व बाबी जुन्याच आहेत. त्या सर्व समित्यांमध्ये मी स्वतः आहे. त्यातून सरकारने आमच्या मागण्यांवर कोणताही ठोस तोडगा काढलेला दिसत नाही. त्यामुळे जोवर अद्यादेश येत नाही तोवर उपोषण सुरूच ठेवणार, असल्याचा पवित्रा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी घेतला आहे. तसेच सरकारचे प्रतिनिधी आले तर आपण चर्चेस तयार आहोत. पण माघार घेणार नाही.
